दापोली – विजांच्या कडकडाटासह पाऊस, अचानक वादळी वारं अशा वातावरणातील बदलत्या परिस्थितीमुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे बाहेर सुमुद्रात मासेमारीस गेलेल्या नौकांनी दिघी आणि जयगड खाडीचा आसरा घेतला आहे. वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीस समुद्रात जाणे धोक्याचं ठरेल असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
नुकतीच गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. पापलेट, म्हाकूळ, सुरमई, कोळंबी आदी किंमती मासळी मिळत होती. लॉकडाउन नंतर नव्या हंगामाची चाहूल लागली असतानाच सध्या किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ६ तारखेस अचानक रात्री वादळ झाले त्यामध्ये एका मासेमारीकरिता जाण्यास तयार असलेल्या नौकेस जलसमाधी मिळाली. त्यानंतर पुन्हा ७ तारखेस हवामान खात्याने वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असून मासेमारीकरिता न जाण्याचे आदेश दिले. पुन्हा तिथे मासेमारी थांबली. पुनः दोन तीन दिवसांनी विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. सध्या समुद्रात वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगून मासेमारी केली जात आहे.
साधारण वातावरण निवळल्यावर मच्छीमार मासेमारीकरिता जात आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी हर्णे बंदरातील मच्छीमार उत्तरेकडील बाजूस मासेमारीकरीता गेले असताना समुद्रामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नौकांनी दिघी खाडीचा आसरा घेतला दक्षिणेकडे गेलेल्या मच्छीमारांनी जयगड खाडीचा आसरा घेतला. आणि जवळपास मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी आंजर्ले खाडीमध्ये पलायन केले. वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांची एकच धावपळ उडाली. जसजस वातावरण शांत होईल तेंव्हा नौका बंदरात येतील. अजूनही किमान २० ते ३० मासेमारी नौका नांगर टाकून दिघी खाडीत उभ्या आहेत अस येथील मच्छीमारांनी सांगितले.
“गेले दोन दिवसांपूर्वी पासूनच समुद्रामध्ये वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नुकतीच कुठे हंगामाला सुरुवात झाली होती तर वातावरणाने डोके वर काढले आणि मच्छीमारांची एकच खळबळ उडाली आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे उत्तरेकडे मासेमारीस गेलेल्यांपैकी किमान १०० नौका दिघी खाडीत घुसल्या तर दक्षिणेकडे मासेमारीकरिता गेलेल्यांपैकी किमान ७० ते ८० नौकांनी जयगड खाडीचा आसरा घेतला आज सकाळी थोडं वातावरण शांत असल्याने मच्छीमार कदाचित मासेमारीकरिता निघाल्या असण्याची शक्यता आहे परंतु हे वतावरणातले बदल असेच चालू राहिले तर कस मच्छीमारांनी जगायचं ? असे येथील मच्छीमार अनंत चोगले यांनी सांगितले.