चिपळूण ; तुमची मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का? -भास्करराव जाधव

0
702
बातम्या शेअर करा

चिपळूण – तुमची मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का, असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना खरमरीत पत्र लिहून केला आहे. तसेच हातपाटी वाळू व्यावसायिकांचा पुळका असलेले राजकीय पुढारी दलाल असल्याचा आरोप करीत गोवळकोटमधील बेकायदा उत्खनन कधी थांबणार, असा प्रश्न या पत्रात विचारला आहे.

या पत्रात म्हटले आहे की,आपण उपविभागाचा पदभार
स्वीकारल्यानंतर कालुस्ते येथे बेकायदा होणाऱ्या वाळू उत्खननावर मोठी कारवाई केली. मात्र या कारवाईत वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गोवळकोट येथे वाळू उत्खनन करणाऱ्या नऊ होडय़ा बुडवल्या व काही दिवसांनी सर्व होडय़ा वर येऊन पुन्हा उत्खनन करू लागल्या. या काळात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन व त्यासाठी नाकाबंदी असतानाही गोवळकोट येथून राजरोसपणे दिवसाढवळय़ा वाहतूक होत होती, ही बाब आश्चर्यकारक वाटते.

एखादा पोलीस निरीक्षक नव्याने रूजू झाल्यावर मटका, जुगार, दारूधंदे यांच्यावर कारवाई करून आपली जरब बसवून दबदबा वाढवतो. मात्र आपली आवक वाढल्यावर पुढे तेच धंदे जोमाने चालतात. आपलेही तसेच होणार, अशी शंका मला त्याचवेळी आली होती. कारण तुमची काही ठराविक वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसत आहे. तुम्हाला बेकायदा वाळू व्यवसाय पूर्णपणे बंदच करायचे असतील तर सरसकट कारवाई करावी, जे राजकीय पुढारी आपल्याला निवेदने देऊन हातपाटी व्यावसायिकांचा पुळका असल्याचे दाखवत आहेत, ते पुढारी खरोखरच शासनाचा महसूल वाचवत आहेत. व्यावसायिकांना मदत करत आहेत की, व्यावसायिक व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक दलाली करीत आहेत, याची खात्री करावी.
खाडीत असणाऱ्या शेकडो होडय़ांना व्ही. आर. सी. नाही. अशा होडय़ांवर संबंधित खात्याकडून कारवाई का करून घेतली जात नाही? रात्री-अपरात्री विशिष्ट लोकांवर कारवाई केल्याचे नाटक करण्याऐवजी गोवळकोट येथील शासकीय जागेत 50 पेक्षा जास्त उभ्या करून ठेवलेल्या होडय़ा जप्त का करत नाही, गोवळकोट येथे महसूलच्या जागेत कायम अवैध वाळूसाठा असतो. त्यावर का कारवाई करीत नाही, असे अनेक प्रश्न विचारत सरसकट कारवाई न केल्यास अन्यायग्रस्त व्यावसायिक उपोषणाला बसतील, असा इशारा दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here