नंबर प्लेट गायब, कागदपत्रांचा पत्ता नाही; तरीही ‘व्हीआयपी’ थाटात गुहागर चिपळूण मार्गावर कचरा वाहतूक!
गुहागर – गुहागर–चिपळूण मार्गावर दुर्गंधीयुक्त घनकचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाबाबत प्रगती टाइम्सने वृत्त प्रसिद्ध करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत गणेशखिंडी येथील चेकपोस्ट नाक्यावर संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली असून, वाहनाला एकूण ९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील घनकचऱ्याची वाहतूक करणारे हे वाहन गुहागर–चिपळूण मार्गावरून नियमित ये-जा करत असल्याची बाब समोर आली होती. वाहनाला नंबर प्लेट नसल्याचा आरोप, आवश्यक कागदपत्रांबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि वाहनातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांना होणारा त्रास याकडे प्रगती टाइम्सने लक्ष वेधले होते. तसेच, चिपळूण शहरातील कचरा बोरगाव येथील मोरेवाडी परिसरात टाकला जात असल्याच्या आरोपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. शहर स्वच्छतेच्या नावाखाली ग्रामीण भागाला दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असेल, तर संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती.
या प्रकरणात रत्नागिरी येथील मोटार वाहन निरीक्षक योगेंद्रसिंह शितोळे देशमुख यांच्या संबंधित आरटीओ पथकाने कारवाई केली. या कारवाईत वाहनाला ९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
प्रगती टाइम्सने नागरिकांच्या समस्या मांडत संबंधित यंत्रणांना जाब विचारल्यानंतर वाहनावर कारवाई झाल्याने या वृत्ताची चर्चा होत आहे. मात्र, दंडात्मक कारवाईपुरतेच हे प्रकरण मर्यादित न राहता वाहनाची कागदपत्रे, कचरा वाहतुकीचे नियम आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत यांचीही सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणे, हीच पत्रकारितेची ताकद! प्रगती टाइम्सच्या वृत्तानंतर झालेल्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर देखरेख ठेवली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















