चिपळूण – चिपळूण–गुहागर मार्गावर कंपोस्ट खताच्या नावाखाली घनकचरा वाहतूक करणारे एक वाहन सातत्याने धावत असल्याचे दिसत आहेत. या वाहनातून बॉयलर कोंबड्यांचे टाकाऊ अवशेष, औषधांचा कचरा आणि दुर्गंधीयुक्त घनकचरा वाहून नेला जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या वाहनाला नंबर प्लेट नसल्याचे दिसत आहे.असे असतानाही परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष जात नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या वाहनाच्या मागून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने वाहनचालकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाहनाला नंबर प्लेट नसल्याचा तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा आरोप खरा असेल, तर संबंधित यंत्रणा इतके दिवस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे, चिपळूण शहर स्वच्छ करण्याच्या नावाखाली नगर परिषदेचा घनकचरा बोरगाव येथील मोरेवाडी परिसरात टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न ग्रामीण भागाच्या माथी मारला जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. शहर स्वच्छ आणि ग्रामीण भाग दुर्गंधीच्या विळख्यात, असा कारभार कितपत योग्य आहे?
दुचाकीस्वारांवर हेल्मेट आणि नंबर प्लेटसाठी कारवाई करणाऱ्या यंत्रणांना हे वाहन का दिसत नाही? सामान्य वाहनचालकांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित असताना, नंबर प्लेट नसल्याचा आरोप असलेले वाहन रस्त्यावरून बिनधास्त फिरत असेल, तर कायद्याची अंमलबजावणी नेमकी कोणासाठी, असा बोचरा प्रश्न निर्माण होतो. या वाहनातून अन्य अवैध वस्तूंचीही वाहतूक होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि परिवहन विभागाने वाहनाची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. आता तरी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि चिपळूण नगर परिषद जागे होणार का? संबंधित वाहनाची कागदपत्रे, नंबर प्लेट, वाहतुकीची वैधता आणि कचरा विल्हेवाटीची पद्धत यांची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई होणार का, याकडे चिपळूण–गुहागर मार्गावरील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
603
















