गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी, गुरववाडी येथे बेपत्ता झालेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घराजवळील विहिरीच्या पाण्यात आढळून आला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून ही आत्महत्या आहे की घातपात अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.
झोंबडी, गुरववाडी येथील हिरु धोंडू गुरव असे मृत वृद्धेचे नाव आहे. या २४ जून रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्या कुठेही सापडल्या नाहीत. त्यानंतर, २५ जून रोजी गुहागर पोलीस ठाण्यात हिराबाई गुरव बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शोधकार्य सुरू असतानाच, सायंकाळी झोंबडी येथील केशव दर्वे यांच्या पडक्या घराच्या पाठीमागील विहिरीच्या पाण्यात हिराबाई यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या वयात त्यांनी हा निर्णय का घेतला.? किंवा त्यांचा कोणी घातपात केला काय.? याची चौकशी सुद्धा पोलिसांनी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.