गुहागर – गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी शृंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील काही पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जवळच्या नाल्याला निवासी गाळे, टपऱ्या यांचे गटाराचे पाणी सोडल्याने याचा परिणाम आजुबाजूच्या विहिरी, बोअरवल यांच्या जलस्त्रोतांवर झाल्याने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे आरोग्य गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोणाच्या आशीर्वादाने आणि पाठिंबाने हे सांडपाणी सोडण्यात येत आहे. याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे.
शृंगारतळी वेळंब फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवळे गावच्या दिशेने जातो. गुहागर – चिपळूण महामार्ग रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. ही गटारे या नाल्याला सोडण्यात आली आहेत. ही गटारे बाजारपेठेतील लहान-मोठे दुकानदार, टपरीधारक तसेच काही निवासी सदनिका यांना लागूनच गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारात टाकण्यात येतो. या गटाराचे पाणी या नाल्याला जाऊन मिळते. तसेच वेळंब रोडकडून येणाऱ्या नाल्यामध्ये तेथील रहिवाशांचे सांडपाणी तर काही शौचालयांचेही वाहिन्या या नाल्यात सोडण्यात आल्या आहेत.
शृंगारतळीतील एक हाँटेल व्यवसायिक हाँटेलमधील दिवसभराचे सांडपाणी एका खड्ड्यात साठवण करुन ठेवतो व रात्री ते सांडपाणी नजीकच्या नाल्यात सोडत असल्याची चर्चा शृंगारतळी बाजारपेठेत आहे. एकूणच या नाल्याला सर्वच बाजूने सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जानवळे गावापर्यंत पोहचलेला असल्याने आजुबाजूचे विहीर, बोअरवेल यांचे पाणी दूषित झाले आहे. बरेच वर्षे हा प्रकार सुरु आहे. मात्र, याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नाही.
जलस्त्रोत दूषितमुळे शृंगारतळीसह जानवळे गावात आरोग्याचे बारा वाजले आहेत. यापूर्वी अनेकांना काविळसारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडे याविषयी तक्रारीही गेल्या आहेत. यावर ग्रा.पं. प्रशासनाने आपली माणसे पाठवून पाहणी केली व याचा अहवाल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. यावर स्थानिक ग्रा.पं. वा पंचायत समिती विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

– आगामी १० दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास नाल्यातील सांडपाणी ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकण्याची मी पाटपन्हाळे ग्रा.पं.ला सूचना केली आहे. येथील सांडपाण्याच्या दुर्गंधीचा संपूर्ण कुटुंबाला त्रास होत आहे. माझ्या पाणवठ्याचे जलस्त्रोत दूषित झाल्याने बाहेरुन पाणी विकत आणावे लागत आहे.
-प्रसाद (पिंट्या) जावकर, ग्रामस्थ
– माझ्या विहिरीच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असून ते वापरायोग्य नाही. याचा त्रास माझ्या कुटुंबियांना यापूर्वीही झाला असून काही महिन्यांपूर्वी माझ्या मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावे लागेल.
-मयूर भोसले, ग्रामस्थ जानवळे