गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी व वेळंब फाट्याजवळून जाणाऱ्या नाल्यामध्ये निवासी गाळ्यांचे सांडपाणी सोडले जात असल्यामुळे गेले काही दिवस शृंगारतळीसह जानवळे गावच्या हद्दीतील निवासी भागात जलस्त्रोत दूषित होत असल्याचे वृत्त प्रगती टाइम्स ने प्रसिद्ध करता सर्वत्र एकच खळबळ माजली आणि प्रगती टाइम्सच्या वृत्ताची दखल घेत नुकतेच गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.
शृंगारतळी वेळंब फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवळे गावच्या दिशेने जातो. गुहागर – चिपळूण महामार्ग रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. ही गटारे या नाल्याला सोडण्यात आली आहेत. ही गटारे बाजारपेठेतील लहान-मोठे दुकानदार, टपरीधारक यांना लागूनच गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारात टाकण्यात येतो. या गटाराचे पाणी या नाल्याला जाऊन मिळते. तसेच वेळंब रोडकडून येणाऱ्या नाल्यामध्ये तेथील रहिवाशांचे सांडपाणी तर काही शौचालयांचेही वाहिन्या या नाल्यात सोडण्यात आल्या आहेत.
कोणाच्या आशीर्वादाने ? शृंगारतळी नाल्यांमध्ये गटाराचे सांडपाणी ….पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित
एकूणच या नाल्याला सर्वच बाजूने सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जानवळे गावापर्यंत पोहचलेला असल्याने आजुबाजूचे विहीर, बोअरवेल यांचे पाणी दूषित झाले आहे. बरेच वर्षे हा प्रकार सुरु आहे. मात्र, याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नाही. जलस्त्रोत दूषितमुळे शृंगारतळीसह जानवळे गावात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी अनेकांना काविळसारख्या आजारांना सामोरे जावे लागले आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडे याविषयी तक्रारीही गेल्या होत्या. अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर व इतर अधिकारी, चिपळूण प्रदूषण मंडळाचे अधिकारी उत्कर्ष सिंगारे, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, जानवळे सरपंच जान्हवी विखारे, सर्व सदस्य, जानवळे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन कोंडविलकर, पाटपन्हाळे तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिनेश चव्हाण व तक्रारदार प्रसाद जावकर, मयूर भोसले आदी ग्रामस्थांनी नाल्याची पाहणी केली.
यानंतर झालेल्या चर्चेनंतर तक्रारदार नागरिकांनी आपली व्यथा मांडून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. यावेळी सिंगारे यांनी सांगितले की, येथील पाणवठ्यांचे पाणी पिण्यायोग्य नाहीच शिवाय ते आंघोळीसाठीही वापरु नये अशा सूचना केल्या. तसेच गटविकास अधिकारी भिलारे यांनी संबंधित सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटीसा देण्यात याव्यात असे आदेश ग्रामपंचायतीला दिले. आठ दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे नागरिकांना आश्वासन दिले.
या नाल्या संबंधित व दूषित पाण्यासंबंधी पिंट्या जावकर हे गेले अनेक वर्ष लढा देत आहेत. अनेक वेळेला त्यांनी या नाल्यातून दूषित पाणी वाहत असल्याची तक्रारी केली होती अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे सुद्धा सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
या दूषित पाण्यासंदर्भात प्रगती टाइम्सने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून हा गैरप्रकार उघड केल्याने प्रगती टाइम्सचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. याही पुढे ही प्रगती टाइम्सने समाजात घडणाऱ्या अघटीत घटना आणि दुर्लक्षित प्रश्नांची अशाच प्रकारे दखल घेऊन त्या सर्वसामान्यांपुढे मांडाव्यात अशी अपेक्षा स्थानिकांसह वाचकांनी केली आहे.