रत्नागिरी – दिवसेंदिवस रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानात अधिकाधिक वाढ होऊ लागली आहे. दरवर्षी होळीनंतर साधारणत: मार्च महिन्यात तापमानवाढीला सुरुवात होते; पण यंदा २१ फेब्रुवारीपासूनच पारा वाढू लागला आहे. बुधवारी रत्नागिरीतील तापमानाची नोंद ३९ अंश सेल्सिअस इतकी झाली.
पहाटे गारवा आणि सकाळी साधारणत: ९ ते १० वाजल्यापासून उष्म्यात वाढ होऊ लागली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी अगदी साडेचार वाजेपर्यंतचे तापमान असह्य होत आहे.
रत्नागिरीत २६ फेब्रुवारी २०१८ साली भारतीय हवामान विभागाने नोंदवलेले रत्नागिरीचे तापमान ३८ अंश सेल्सिअस हे या महिन्यातील उच्चांकी तापमान होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस एवढे कमाल आणि १९ ते २० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान असते. २०१८ नंतर आता सहा वर्षांनी यंदाच्या २६ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या ३९ अंश सेल्सिअस तापमानाने २०१८ सालचा उच्चांकही मोडला आहे.