गुहागर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने भव्य शिव पादुका पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथून शिव पादुका पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहेत.
छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा गेली काही वर्ष शृंगारतळी येथून काढली गेली. परंतु, या यात्रेला उशीर होतं असल्याने यावर्षी गुहागर शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथून पादुकांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठ मार्गे श्री देवव्याडेश्वर मंदिर, तेथून ९.३० वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. याठिकाणी शिवरायांच्या पादुकांची आणि दुर्गा भवानी माता यांची ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन करून भेटीचा सोहळा पार पडणार आहे. तसेच यावेळी शिवपादुका व दुर्गा भवानी मातेचे परिसरातील १०१ महिलांच्या वतीने औक्षण करण्यात येणार आहे. ज्या महिलांना औक्षण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी देवस्थानच्यावतीने समस्त शिवप्रेमींसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तिथून शिव पादुकांची पालखी मिरवणूक वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेल बाजारपेठ मध्ये दाखल होणार आहे. याचवेळी गुहागर आणि शृंगारतळी येथून आलेल्या मिरवणुक अंजनवेल ग्रामस्थांच्या उपस्थितीत गोपाळगडापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाईल. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे. या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित रहावे, असे आवाहन शिवतेज फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने १६ व्या शतकात बांधला. इ.स. १६६० मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरातखानने तो इ.स. १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर इ.स. १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करुन त्यात सुधारणा केल्या. तर नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. इ.स. १८१८ रोजी कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटीशांच्याच ताब्यात होता. तर प्रश्न राहतो या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाऊंडेशन, गुहागर व समस्त गुहागर वासीयांनी पुढाकार घेतला आहे.