गुहागर- ( प्रगती टाइम्स टीम) गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमाराच्या झालेल्या हत्येप्रकरणी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील ३२ गाव खारवी समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा समाज समिती गुहागरचे अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली १८ डिसेबर रोजी गुहागर तहसिल येथे आयोजित करण्यात आला आहे.
साखरीआगर येथील एका गरीब मच्छीमार कुटुंबातील रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणारे जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने निर्घुण हत्या २८ आँक्टोबर रोजी केली होती. तसेच मासेमारी नौकेतील जाळी सह नौकेलाही पेटवून देऊन नौका मालकाचे सुमारे दोन ते सव्वा दोन कोटीचे नुकसान केले होते. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला. या नरभक्षकाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, संबंधित घटनेचा
खटला जलदगती न्यायालयात चालवा तसेच निःपक्षपातपणे पोलीस तपास व्हावा असे निवेदन मोर्चाप्रसंगी तहसिलदारांना देण्यात येणार आहे. या आंदोलनाला दर्यावर्दी मच्छीमार संघटना दाभोळ, दापोली, श्रीवर्धन तसेच खारवी समाज ज्ञाती बांधव गट क्रमांक ३ गुहागर आणि सागरी मच्छीमार संघटना, रत्नागिरी, राजापूर तालुका, अखिल महाराष्ट्र कष्टकरी मच्छीमार खलाशी संघटना रत्नागिरी विभाग यांनी पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी या जनआक्रोश मोर्चाला उपस्थित रहावे असे आवाहन नाटेकर यांनी केले आहे.