बातम्या शेअर करा

खेड – आधीच दोघींशी लग्नगाठ बांधून तिसरीसोबत साखरपुडा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी आरोपी योगेश हुमने याची थेट तुरुगांत रवानगी करून अनेक महिलांचे संसार वाचवले आहेत. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील ३४ वर्षीय विवाहितेने केलेल्या तक्रारीनंतर या लखोबाचे अनेक रंग उलगडले आहेत.

आरोपीच्या विवाहित पत्नीने पतीविरोधात मानसिक छळ, आर्थिक फसवणूक तसेच तो विवाहित असताना फसवणूक करून तिच्याशी लग्न केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर तिचा पती योगेश हुमने याच्याविरोधात नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्याकडे तपास देण्यात आला. प्राची पांगे यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. त्यासाठी एक सापळा रचला होता. योगेशने पत्नीच्या नावे कार खरेदी केली होती. ती त्याला त्याच्या नावावर कार करायची असल्याने पत्नीला भेटायला आलेल्या योगेशच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

हा आरोपी योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जामगे गावचा आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच योगेशचे काळे कारनामे बाहेर आले. योगेशने आजवर अनेक अविवाहित मुलींची फसवणूक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून तो महिला, मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करायचा. विवाहित योगेशने दोन लग्ने करून आता तिसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम केला होता. त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणे सुरू केले होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.लग्न होत नसल्यास, घटस्फोटित असल्यास किंवा लग्नाला उशीर होत असेल तर काहीजण सोशल मीडियाचा आधार घेतात. अशा महिलांना योगेश लक्ष्य करत होता. त्यांच्याशी ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करायचा. योगेशला एक मुलगीही आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्यांत महिला हवालदाराचाही समावेश आहे. गंभीर म्हणजे नेरळ परिसरातील अशा दोन आरोपीना नेरळ पोलिसांनी यापूर्वीच तुरुंगात धाडले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here