पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भालचंद्र चव्हाण यांचे द:खद निधन ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व हरपले

0
37
बातम्या शेअर करा


गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय भालचंद्र उर्फ भाईसाहेब चव्हाण याचे दि.३१ आक्टोबर २०२४ रोजी दादर मुंबई येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून भविष्याचा वेध घेणारे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व हरपले या शब्दांत सर्वत्र शोक व्यक्त केले जात आहे.


गुहागरचे माजी आमदार स्व. डॉ तात्यासाहेब नातू यांनी 90 च्या दशकाच्या अखेरीस भालचंद्र उर्फ भाईसाहेब चव्हाण यांच्याकडे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी सोपवली तेंव्हा पाटपन्हाळे व तळवली या दोन ठिकाणी (इ.५वी ते १०वी) अनुदानित शाळा सुरु होत्या. त्या वेळी गुहागर व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही कनिष्ठ महाविद्यालयाचेही वर्ग नव्हते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चिपळूण सारख्या ठिकाणी जावे लागायचे. त्या मुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेली मुले बहुदा दहावी-बारावी नंतर शाळा अर्ध्यावर सोडून मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी जाऊन मिळेल ती नोकरी करत असतं. इच्छा असूनही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. तसेच त्या मुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्व.भालचंद्र चव्हाण साहेब हे चेअरमन झाल्यानंतर सुरुवातीस न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे या हायस्कूलला जोडून त्याच इमारतीत कला-वाणिज्य व नंतर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले. त्या नंतर ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटपन्हाळे म्हणून नावारुपास आली.
तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी शृंगारतळी हे मध्यवर्ती ठिकाण होते तसेच शृंगारतळी ही तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असल्याने येथे उच्च शिक्षणाची सोय होणे खूप गरजेचे होते. भविष्याचा वेध घेणारे व्यक्तीमत्व असलेले भाईसाहेब चव्हाण स्वतः उच्च शिक्षित होते. मुंबई सारख्या ठिकाणी आर टी ओ ऑफिसर म्हणून नोकरी करत असतानाच गुहागर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून भाईनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत शक्य ते सर्व प्रयत्न केले. हे करत असताना स्थानिक पातळीवरील अनेक नामवंत शिक्षणप्रेमी व्यक्तींना बरोबर घेतले. त्या पैकी बहुतेकांनी भाईंना साथ दिली. ज्यानी सहकार्य केले त्यांच्यासह व ज्यांचे सहकार्य मिळाले नाही त्यांच्या शिवाय स्वतः जातीने प्रत्येक लहानसहान गोष्टीत लक्ष घालून विशिष्ट ध्येयाने झपाटल्यासारखे काम करत राहिले. त्या मुळेच नव्या जागेत भव्य दिव्य प्रशस्त अशी इमारत उभी राहू शकली. त्या मुळेच येथे पाटपन्हाळे वरिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र सुंदर अशा इमारतीत स्थलांतरित होऊ शकली. या इमारतीसाठी जागा मिळवणे, ती विकसित करणे, इमारत आराखडा तयार झाल्यावर इमारतीचे भूमीपूजन ते बांधकाम पूर्ण होई पर्यंत एवढेच नव्हे तर तेथे प्रत्यक्ष काॅलेज चे वर्ग सुरु होई पर्यंत भाईंनी किती कष्ट घेतले हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. येथे काॅलेजचे सर्व वर्ग नियमित सुरु झाल्या नंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कोर्सेस सुरु करण्याचा आग्रह भाईंचा होता.
सुरुवातीला जुन्या इमारतीतच वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असंत. शृंगारतळी-पाटपन्हाळे येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरु करुन भाईंनी संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण मिळण्याची सोय करुन दिली. याला जोडूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे विविध अभ्यासक्रम सुरु केले. तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण देखील मिळाले पाहिजे या उद्देशाने विशेष प्रयत्न करुन एम. ए. व एम. काॅम चे शिक्षण मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली.
आपल्या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी भाईंनी आपल्या संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल (इंग्लिश मिडियम स्कूल) सुरु केले. अर्थात शासनमान्य परंतु स्वयं अर्थसहाय्यित योजनेतून ती सुरु करण्यात आली आहे. यामुळे शक्य त्या पालकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला. भाईंच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले. या साठी संस्थेने स्वतः जागा विकत घेऊन येथे सध्या तात्पुरत्या स्वरूपात वर्गखोल्या बांधल्या असून तेथेच वर्ग भरतात. सध्या येथे इंग्रजी माध्यमाचे के.जी. ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरु असून सुरुवाती पासूनच या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो, त्या मुळे हळूहळू विद्यार्थी संखेत वाढ होताना दिसत आहे.
तालुक्यातील तळवली येथे संस्थेची अनुदानित दुसरी शाळा आहे. तेथे पूर्वी दहावी पर्यंतच शिक्षण मिळायचे. परंतु दहावी नंतर या परिसरातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी बाहेरगावी धावाधाव करावी लागायची. परिसरातील सर्व सामान्य आर्थिक स्थिती असणऱ्या पालक वर्गाना आपल्या पाल्याला दूरच्या ठिकाणी प्रवेश घेऊन शिक्षण देणे शक्य होत नसे. त्या मुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट रहात असे. तसेच विद्यार्थी संख्या पूर्वी खूप जास्त असल्यामुळे एकाच संस्थेच्या शाळांतील विद्यार्थी असूनही तळवली येथील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे थोडे कठीण जायचे. त्या मुळे भाईंनी तळवली येथील हायस्कूलला जोडून कला – वाणिज्य महा विद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या बदललेल्या धोरणानुसार स्वयं अर्थसहाय्यित योजनेतून हे वर्ग सुरु करावे लागले. परंतु कमीत कमी शुल्क भरुन येथील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे यासाठी भाईसाहेब प्रयत्नशील होते. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी साथ दिली. त्यामुळे तळवली प्रशाला आता न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या नावाने ओळखली जाऊ लागली आहे.
सध्या पाटपन्हाळे येथे केजी पासून ते दहावी पर्यंत इंग्रजी माध्यम, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे पाचवी ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी, कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) सुरु आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे पाचवी ते दहावी मराठी व सेमी इंग्लिश तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि पाटपन्हाळे येथे वरिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे अशी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. वरिष्ठ महा विद्यालयासाठी स्वतंत्र जमीन मिळवून तेथे खास महाविद्यालया साठी आकर्षक,भव्य व प्रशस्त अशी इमारत बांधली गेली असून या इमारतीत काॅलेजचे सर्व वर्ग एकावेळी भरतात शिवाय येथे छोट-मोठे अनेक कोर्सेसही सुरु करण्यात आले आहेत. या माध्यमातून भाईंचे स्वप्नवत कार्य पूर्ण झाली आहे. येथे गेल्यावर भाईंच्या स्मृती जाग्या होतील हे निश्चित.
रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यी व नागरिकांमध्ये क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी “ठाणे मॅरेथॉन” प्रमाणे भाईंनी “पाटपन्हाळे मॅरेथॉन” ची सुरुवात केली होती. या स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट व जेष्ठ नागरिक अशा विविध गटांसाठी मुले-मुली, स्त्री-पुरुष अशा गटांमध्ये या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत असंत. स्पर्धे दरम्यान व्हिडिओ शुटिंग केले जायचे त्याचे प्रसारणही सह्याद्री चॅनल वर केले जायचे. ग्रामीण विद्यार्थी थेट टीव्ही वर दिसू लागले. क्रीडांगण या सदरात वर्षातून दोन-तीन वेळा प्रसारित केले जात होते. काही वर्षांपूर्वी पर्यंत ही स्पर्धा अखंडपणे सुरु राहीली. याचे श्रेय भाईंनाच जाते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी, व खुल्या गटातील स्त्री पुरुष सहभागी होत असंत. भाईंच्या मुळेच रत्नागिरी जिल्ह्यात सर्व प्रथम भव्य मॅरेथॉन स्पर्धा भरवणारी संस्था असा लौकिक संस्थेला प्राप्त झाला.
स्व.भाईंच्या कल्पना प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान संचालक मंडळाने तसेच या पूर्वीच्या संचालक मंडळांनी देखील भाईंना पूर्ण सहकार्य केले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे संस्थेचे कामकाज अविरत चालू राहिले. भाई मुंबई सारख्या ठिकाणी रहात होते तसेच अखेरच्या कार्यकाळात त्यांची प्रकृती ठीक नसतानाही संस्था व संस्थेच्या विविध शाखांच्या उपक्रमांसाठी प्रचंड तळमळ व इच्छाशक्तीमुळे उपस्थित राहून मार्गदर्शन करत असंत. भाईंचे हे कार्य कुणालाही कदापि विसरता येणार नाही. संस्थेचे इंग्लिश मिडियम स्कूल व सिनियर काॅलेज हे केवळ भाईंच्या पुढाकारामुळे त्यांच्या संकल्पनेतूनच उभे राहू शकले असे म्हटल्यास वावगे ठरु नये. त्या मुळे भाईंच्या अचानक निघुन जाण्याने संस्थेची फार मोठी हानी झाली असून त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे शक्य नाही. परंतु तरीही संस्थेचे कामकाज भाईंच्या विशिष्ट कार्यपध्दती प्रमाणे ग्रामीण विद्यार्थी हितासाठी पूर्ववत नव्या उमेदीने सुरु ठेवणे हीच भाईंना खरी श्रध्दांजली ठरेल. स्वर्गीय भाईंच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली.

बसवंत थरकार, माजी मुख्याध्यापक,
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here