चिपळूण जनता दरबार ; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील- खा. नारायण राणे

0
6
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळुणातील नागरिकांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील जी निवेदन दिली आहेत, ते कायद्याच्या चौकटीत असणारे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाय जे प्रश्न सुटू शकणार नाहीत, या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ‘एक्सप्लेशन’ घेतले जाईल. तसेच जिथे- जिथे विकास कामांसाठी निधी कमी पडेल. तिथे खासदार निधी देऊन जनतेचे विकासात्मक प्रश्न मार्गी लावू, शेवटी लोकांसाठी निधी असतो, त्याचा आपण पुरेपूर वापर करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूणवासीयांना आयोजित जनता दरबारात दिली.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात खा. नारायण राणे यांच्या पुढाकाराने मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी रेल्वेने आलेल्या खा. राणे यांचे भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. यावेळी जनता दरबारात चिपळूणवासीयांनी पोलीस, एस.टी. स्थानक इमारत बांधकाम, एस.टी. फेऱ्या, कोयना प्रकल्पग्रस्त, रस्ते, धरण दुरूस्ती, औद्योगिक वसाहत, साफंयीस्टमधील कामगारांचा प्रश्न, बीएसएनएल टॉवर, धनगरवाड्यांमधील रस्ते, परशुराम घाटाची दुरावस्था, चिपळूण शहरातील लाल, निळी पुररेषा, गोविंदगड किल्ला ते परशुराम रोपवे, गोविंदगड किल्ल्याची दुरावस्था, कोकण रेल्वे दुपदरीकरण, वंदे भारत एक्सप्रेसला थांबा, गाळ उपसा, चिपळूण न्यायालय इमारतीचे स्थलांतर, म्हाडाच्या जागेसंदर्भातील मोबदला अशा अनेक मुद्यांशी निगडीत प्रश्न चिपळूणवासीयांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर काही दिवसातच तोडगा काढण्याच्या सुचना खा. राणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी खा. नारायण राणे यांनी आपल्या मनोगतात जनता दरबारात नागरिकांनी जे प्रश्न मांडले आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रात मंत्री असताना कमीत कमी १५ ते २० विभागांचा मंत्री होतो. आपल्या टेबलवर आलेली फाईल महिनोन‌्महिने राहिली असे कधीच घडले नाही. जतनेचा प्रश्न का सुटू शकत नाही? ते अधिकाऱ्यांकडून लेखी मागवत असे. तेव्हा लोकांचे प्रश्न तात्काळ सुटत असत, अशी आठवण मंत्रीपदाच्या कारकिर्दीची यावेळी खा. राणे यांनी उपस्थितांना करून दिली. कार्यकर्ता तत्पर व परिपक्व असला पाहिजे. जनता दरबारादरम्यान आपले चौफेर लक्ष होते. कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकवेळी आपल्याकडे प्रश्न येता कामा नयेत, असे स्पष्ट करताना कार्यकर्ता तत्पर व परिपक्व असला पाहिजे. जनतेचे समाधान होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्याने तो प्रश्न सोडविण्यासाठी झटत राहिले पाहिजे. जनतेनेदेखील थोडक्यात मोजक्याच योग्य शब्दात प्रश्न मांडले पाहिजेत, असे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, सतीश मोरे, राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, चिपळूण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक परिमल भोसले, रवींद्र नागरेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते.तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, रामदास राणे, मंगेश तांबे, माजी नगरसेवक विजय चितळे, संदीप भिसे, शुभम पिसे, प्रफुल्ल पिसे, राकेश घोरपडे, शशिकांत साळवी, योगेश शिर्के, दिपक महाडिक, रूपेश आवले, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा रसिका देवळेकर, प्रणाली सावर्डेकर, जि.प. माजी सदस्या दिप्ती महाडिक, स्नेहा मेस्त्री, वैशाली निमकर, सुप्रिया उतेकर आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here