आ. जाधवांच्या रुपाने गुहागरला सक्षम नेतृत्व मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, मने जुळल्याने एकत्र निवडणूक लढणार

0
1
बातम्या शेअर करा

गुहागर – वरीष्ठ स्तरावर शिवसेना व मनसे यांची मने जुळली आहेत. तसेच गुहागरला एक सक्षम नेतृत्व आ. जाधव यांच्या रुपाने मिळाले असून एकत्र काम करायला आम्हाला मजा येईल. त्यामुळे वरीष्ठांच्या निर्णयानुसार, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आ. जाधव यांच्याशी एकत्र बसून जागांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती गुहागर तालुका मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकत्रित लढत न झाल्यास स्वबळावर आम्ही सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी व मनसेची भूमिका मांडण्यासाठी गुहागर मनसेच्या शृंगारतळी संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना गांधी म्हणाले, गुहागर नगरपंचायतीसह जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही सर्व उमेदवार आरक्षणानुसार उभे करणार आहोत. स्वबळावर लढल्यास आम्ही सर्वच जागांवर लढणार आहोत. नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी शृंगारतळी मनसे कार्यालयाला भेट दिली. यावेळी आ. जाधव यांनी आम्ही कागदावर नसलो तरी आमची मने जुळल्याचे बोलून दाखविले. त्यामुळे आम्ही एकत्र लढणार आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच अनेक शिवसैनिकांचे आम्हाला फोन आले असून एकत्र लढण्याविषयी बोलत आहेत. त्यामुळे एकत्र बसूनच आम्ही जागांबाबत चर्चा करणार आहोत. प्रत्येक तालुक्यातून दोन गटांची मागणी आम्ही करणार असून त्यादृष्टीने चाचपणी सुरु आहे. गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर चिपळूण तालुक्यातील उमरोली गटात सक्रीय आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. प्रमोद गांधी शृंगारतळी जिल्हापरिषद गटातून लढणार असल्याचे बोलले जात असेल तर ते चांगलेच असेल. मात्र, तो निर्णय चर्चा करुनच होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैभव खेडेकर यांच्या जाण्याने मनसेला जिल्ह्यात काहीही फरक पडणार नाही. त्यांच्याबरोबर गेलेले काहीजण परत आले असून त्यांचा दादरमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. खेडेकर यांच्या रिक्त जागेविषयी वरीष्ठ निर्णय घेणार असून तो आम्हाला मान्य असणार आहे. आ. भास्कर जाधव व विक्रांत जाधव यांची आम्ही भेट घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. तसेच एकत्र लढण्याविषयी व जागांविषयी चर्चा करणार आहोत. पुढील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा असून त्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. आहे. त्यावेळीही जागांविषयी चर्चा होईल, असे गांधी यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here