गुहागर – महायुतीचे गुहागर विधानसभेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पार पडली यावेळी नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करणार राजेश बेंडल सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी येथून दिली आहे.त्यामुळे या संधीच सोनं करा.माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी त्याच्या मागे ठामपणे उभ्या रहा.त्याचा विजय हा माझा विजय आहे. असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले तर ज्यांना तुम्ही वारंवार निवडून दिलेत त्यांनी काहीच केले नाही.जर गुहागर मतदारसंघाचे नंदनवन करायचे असेल तर आता बदल अपेक्षित आहे.तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे की नकला,मिमिक्री करणारा पाहिजे हे ठरवा.आता भाकरी परतायची वेळ आली आहे.नासलेला आंबा आता फेकून द्या त्याची कोय पण नको आणि साल पण नको अश्या शब्दात भास्कर जाधव यांची खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली.
कोकणाने महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे. याठिकाणी काजूप्रक्रिया, आंबाप्रक्रिया यासारखे व्यवसायांना उभारी देण्याची गरज आहे.येथील पर्यटन व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे.येणाऱ्या काळात कोकणातील उद्योग -व्यवसाय आणि रोजगाराच्याबाबतीत राहिलेला बॅकलॉग आमचे सरकार भरून काढेल अशी ग्वाही शृंगारतळी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आमचे सरकार काम करणारे सरकार आहे.विरोधक म्हणतात महाराष्ट्रातील उद्योग-धंदे दुसरीकडे पळवले.अरे आमचे सरकार आल्यावर आम्ही 5 लाख कोटींचे उद्योग या महाराष्ट्रात आणले.रत्नागिरी जिल्ह्यात देखील कोका- कोला सारखी कंपनी आणली.तुम्ही काय केले अडीच वर्षे राज्याची वाट लावली.सर्व प्रकल्प- योजना बंद पाडले.52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली. अडीच वर्षांत तुम्ही काय केलं ते तरी दाखवा.जेंव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेंव्हा आम्ही ती देणार नाही केवळ घोषणा केली अशी टीका झाली.पण आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता जमा आधीच केला.डिसेंबरचा पण हप्ता निवडणूकीनंतर तुमच्या खात्यात जमा होईल व 1500 वरून ती रक्कम 2100 होईल अशी खात्री देताना हे सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे सरकार नाही तर हप्ते देणारे आहे असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला.या योजनेमुळे मला जेलमध्ये टाकायला हे निघाले होते पण आज सांगतो मी एकदा काय शंभरदा जेलमध्ये जायला तयार आहे.एकनाथ शिंदे संघर्षातून आला आहे.आंदोलनातून आला आहे त्यामुळे पोकळ धमक्या मला देऊ नका असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.तुमचे सरकारच जर येणार नाही तर मग 3000 देणार कुठून अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली.
त्याचप्रमाणे निरामय हॉस्पिटलसाठी 10 कोटी तुमच्या खात्यातून द्या अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांना त्यांनी या सभेत केली. यावेळी शिंदे यांनी विनय नातू तसेच सर्व घटक पक्षांचे विशेष आभार मानले.यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत,महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल,भाजप नेते माजी आम.डॉ.विनय नातू,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत,सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर,संतोष जैतापकर, रामदास राणे,बळीराज सेनेचे अशोक वालम,प्रकाश बागवे,कोकरे महाराज तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले.