चिपळूण ; या ठिकाणी होणार विंचू दंशावर मोफत मोफत उपचार..

0
334
बातम्या शेअर करा

गुहागर – पुणे नारायणगाव येथील प्रीमियम सिरम्स अँड व्हॅक्सीनस कंपनीने अतिशय अद्ययावत लॅबोरेटरीमध्ये घोड्याचे रक्त वापरुन तयार करण्यात आलेले विंचूदंश प्रतिविष सिरम (प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम) हे चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू लहान मुलांचे हॉस्पिटल व घोणसरे (उमरोली) येथील विजयश्री हॉस्पिटल येथे १० ऑक्टोबर २०२५ पासून १ वर्षाच्या कालावधीसाठी मोफत उपलब्ध झाले आहे. व विंचू दंशावर उपचारही नाममात्र खर्चात १ वर्षाच्या कालावधीसाठी होणार असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विवेक नातू यांनी केले आहे.

विचूदंशाच्या प्रतिविषावर १६ वर्षापूर्वी डॉ. विवेक नातू, डॉ. विकास नातू, डॉ. संतोष कामेरकर आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनामुळे विंचू दंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे व होणाऱ्या शरीराच्या हानीचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. या प्रतिविष संशोधनाविषयी सांगताना डॉ. नातू म्हणाले, २०१० मध्ये आम्ही डॉक्टरांनी यावर संशोधन केले. हे सिरम विंचवाचे प्रतिविष हे विषावरच प्रतिहल्ला करून त्याला निकामी करते. मुळात विषच निकामी झाल्यामुळे शरीरात प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा ॲड्रीनलिनचा स्त्राव थांबतो. ॲड्रीनलिन हे रक्तात ५ मिनिटांपेक्षा जास्त राहत नसल्याने १ तासात सुधारणा सुरु होते व पेशंट २-४ तासात पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णांच्या शरीरात जाणारे विषाचे प्रमाण हे वेगवेगळे असते व ऋतुमानाप्रमाणे व विंचवाच्या क्षमतेप्रमाणे ते बदलते. तसेच रुग्णाच्या वयानुसारही त्याची गंभीरता वाढू शकते. त्यामुळे विंचवाच्या विषाच्या प्रमाणानुसार देण्यात येणारा प्रतिविषाचा डोसही जोपर्यंत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. तोपर्यंत वाढवला पाहिजे, असा निष्कर्ष आम्ही काढला होता. हे प्रतिविष घोड्याचे रक्त वापरून तयार केले जात असल्याचे सांगून डॉ. नातू यांनी सर्पदंशाच्या प्रतीविषाप्रमाणे या प्रतीविषाची रिॲक्शन येईल का? अशी भीती अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना वाटत होती.पण विंचूदंशाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळे या प्रतीविषावर निर्धोक असा शिक्का बसला. प्रतिविषावर रिॲक्शन आली तर एड्रेनालाईन नावाचे इंजेक्शन द्यावे लागते व रुग्णाला आराम मिळतो. इथे तर विंचू चावल्यामुळे रुग्णाच्या शरीरात हे एड्रेनालाईन मोठ्या प्रमाणात सतत तयार होते व त्यामुळे प्रतिविषाची रिॲक्शन येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या तौलनिक अभ्यासामध्ये १०० च्या वर पेशंटपैकी एकालाही रिॲक्शन आलेली नाही. यापूर्वी प्रतिविष फारसे उपयोगी नाही असा चुकीचा प्रचारही केला गेला. रिॲक्शनची भीती नसल्यामुळे प्रतिविषाचा डोस नक्की करून सदर डोस हा शिरेतून सावकाश देण्याचे सुरु केले. त्यानंतर रुग्ण सुधारण्यासाठी लागणारा वेळही अतिशय कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्राझोसिन औषधापेक्षा अधिक परिणामकारक विंचूदंशावर विंचू प्रतिविष जल हे प्राझोसिन या औषधापेक्षा अधिक परिणामकारक असल्याचा निष्कर्ष २००६-०७ या साली घेतलेल्या तौलनिक अभ्यासमध्ये दिसला आहे. सदर निष्कर्ष असलेला शोधनिबंध जर्नल ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिसिन या जर्नलमध्ये ऑक्टोबर २०१० मध्ये प्रसिद्ध झाला आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी हे प्रतिविष तयार केले ही भारताच्या दृष्टीने गौरवाची बाब असून विंचू दंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे व होणाऱ्या शरीराच्या हानीचे प्रमाण अतिशय कमी झाले असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले. स्व. डॉ. तात्यासाहेब नातू यांचे स्वप्न साकार कै. डॉ. तात्यासाहेब तथा श्रीधर नातू यांनी १९८० ते १९९२ या दरम्यान, वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवून विंचूदंशासाठी प्रतिविष तयार करण्यासाठी संकल्पना मांडली होती व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. शिरोडकर व कै. डॉ. काणकोणकर यांची भूमिका यात महत्वाची होती. माजी आ. डॉ.विनय नातू, महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.दौलतराव अहेर व तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी एफडीएकडून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते, अशी माहिती डॉ. नातू यांनी दिली.
डॉ. विवेक नातू


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here