चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघात नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या विरोधात प्रशांत यादव (अपक्ष ) आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात शेखर निकम (अपक्ष ) रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तीच स्थिती निर्माण झाली आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्याच्या नावासारखे नाव असलेला दुसरा उमेदवार उभा करण्याची पद्धत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघात वापरण्यात आली होती.
आता हाच प्रकार दापोली – खेड विधानसभा मतदारसंघ नंतर चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातही करण्यात आला आहे.
चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ) महायुतीचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) महाविकास आघाडी कडून प्रशांत यादव रिंगणात आहेत. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज आधीच दाखल केले आहेत.
या दोन्ही उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकाच मतदारसंघात दोन प्रशांत यादव आणि दोन शेखर निकम असे अर्ज दाखल आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता नक्की कोणत्या प्रशांत यादव आणि कोणते शेखर निकम निवडणूक जिकणार हे येणाऱ्या 23 तारखेला समजेल