चिपळूण ; गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.. त्या बेकायदेशीर अतिक्रमणासाठी कुंभार कुटुंबाचे 23 पासून पुन्हा उपोषण

0
115
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायत अंतर्गत बिनशेती रस्त्यावर केलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी चिपळूणचा गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश दिल असताना सुद्धाधा मणवणे ग्रामपंचायत चालढकल करीत असल्याने संतापलेल्या कुंभार कुटुंबियांनी स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा छेडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 23 सप्टेंबरपासून चिपळूण शहरातील पंचायत समितीच्या गेटसमोर सकाळी 10 वाजल्यापासून हे उपोषण केले जाणार आहे. उपोषण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

धामणवणे येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासंदर्भात राणी कुंभार, मालसिंग कुंभार यांनी दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर केले होते. यावेळी सरपंच, ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्या समोर हे अतिक्रमण दि. 30 ऑगस्टच्या आत काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मुदत संपत
आलेली असतानाही ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही न केल्याने मालसिंग कुंभार यांनी दि. 28 ऑगस्टच्या आमसभेत प्रश्न उपस्थित करीत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी आ. शेखर निकम यांनी गटविकास अधिकारी यांना ते अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात, असे आदेश दिले होते. मात्र त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही. अखेर कुंभार कुटुंबाने दि. 2 सप्टेंबर रोजी पंचायत समितीसमोर आपले स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू केले. भर पावसात उपोषणकर्ते बसले होते. पावसात भिजल्याने राणी कुंभार यांना चक्कर येऊन त्या तेथेच बेशुध्द पडल्या. यावेळी पुन्हा सरपंच यांनी धामणवणे पिटलेवाडी येथील बिनशेती रस्त्यावरील अतिक्रमण चार दिवसात पोलीस बंदोबस्तात काढण्यासंदर्भात कुंभार कुटुंबाला लेखी पत्र दिले.तसेच बीडीओ यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिल्याने प्रशासनाला सहकार्य करीत त्या वेळचे उपोषणही कुंभार यांनी स्थगित केले.
आता त्या आदेशानंतर पंधरा दिवस ओलांडून गेले तरीही सरपंच, गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काहीच कार्यवाही न केल्याने कुंभार कुटुंबीय आक्रमक झाले आहे. प्रत्येक वेळी नवनवीन मुद्दे उपस्थित करून वेगवेगळी कारणे देऊन तक्रारदारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. संबंधित प्रशासन आपल्या जीवाशी खेळ करीत असल्याचा आरोप करीत दि. 23 सप्टेंबर रोजी पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

या धामणवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासंदर्भात संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत आहेत. लेखी आश्वासने देऊनही अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे त्यांना पदमुक्त करून प्रशासक नेमून बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणीही कुंभार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here