गुहागर – ग्रामीण भागातील बचतगटांना विविध व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य लाभावे यासाठी बँका १ टक्क्यांनी बचतगटांना कर्जे देतात. मात्र, गुहागर तालुक्यातील काही बचतगटांच्या महिला याचा गैरफायदा घेऊन या पैशांच्या आधारे सावकारी धंदे करत असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या बचतगटांना काही सीआरपी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे बँकांची या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. गुहागर तालुक्याच्या राजधानीतच याची सर्वाधिक चर्चा सुरु आहे.
तालुक्यात व्याजाला व्याज चढवून सावकारी धंदे करणारे महाभाग असंख्य आहेत. सर्वसामान्य कामगार, मजूर यांची या सावकारीतून एकप्रकारे पिळवणूक केली जाते. सावकारी धंद्यात सर्वाधिक व्याज लावून हे काळेधंदे बिनधास्तपणे सुरु आहेत. याची फारकाळ चर्चा होत नाही. गरजवंतांना अक्कल नसते अशी एक म्हण आहे. आपण या सावकारीत लुबाडले जात आहोत याचे त्यांना भानही रहात नाही. यातूनच अधिक कर्जबाजारी होऊन एखादी व्यक्ती नैराश्येतून आत्महत्याही करत असल्याचे सभोवताली घडलेल्या घटनांवरुन दिसून येते.
ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यांच्या स्वयंरोजगाराला उभारी मिळावी यासाठी शासन स्तरावरुन महिला बचतगटांना कमी व्याजदरात बँकांमार्फत कर्जे वाटप केली जातात. बँकांही अशा योजना आपल्या पातळीवर आखून बचतगटांना कर्जे स्वरुपात प्रोत्साहन देतात. मात्र, याचा गैरफायदा काही बचतगट घेताना दिसून येत आहेत. गुहागर तालुक्याच्या काही भागात असे प्रकार घडून येत आहेत. बचतगट समूहाचे प्रमुख कमी टक्केवारीने बँकांकडून कर्जे घेऊन ते बाहेर सावकारी धंदे करत असल्याचे बोलले जात आहे.
बँकेकडून १ टक्क्यांनी कर्ज घ्यायचे व तीच रक्कम सावकारीत गुंतवायची असा हा गोरखधंदा सुरु असल्याचे दिसून येत आहे. हे बचतगट गरजवंतांना १० ते १२ टक्क्यांनी पैसे घेऊन व्याज मिळवतात. कागदोपत्री मात्र, आपला व्यवसाय दाखवतात. बचतगटांचे नेमलेले प्रमुख सीआरपी यांना हे सर्व माहित असते. यातील काही सीआरपींचा बचतगटांच्या या कृत्यांना आर्शिर्वाद असतो. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी त्यांच्यामध्ये छुपी युती असते. त्यामुळे काही बचतगट असे धाडस करताना दिसून येत आहेत. त्यातच एका सीआरपी ने तालुक्याची राजधानी असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी लाखो रुपये व्याजाने दिलेत मात्र सध्या ज्यांनी हे लाखो रुपये व्याजाने घेतले ते देण्यास टाळाटाळ करत असल्याने सीआरपी सह बचत गट या देणेदारांपुढे हतबल झाला आहे.