चिपळूण – चिपळूण येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व नारायण तलाव या दोन्ही मोठ्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते व खासदार रवींद्र वायकर यांच्या विशेष उपस्थित पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240818-WA0024-1024x811.jpg)
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील अनंत गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून परिसर सुशोभीकरण व शिवसृष्टीचे कामदेखील आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे हजारो शिवप्रेमींची प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे. तसेच शहरातील आणखी एक महत्वकांक्षी प्रकल्प ठरलेला येथील नारायण तलावाचे अत्याधुनिक सुशोभीकरण देखील पूर्ण झाले आहे. पुरातन काळातील हा तलाव आता अत्याधुनिकतेचा नवा साज घेऊन शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे देखील लोकार्पण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. अशी माहिती चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा तसेच नारायण तलाव या दोन्ही प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा चिपळूण नगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच खासदार रवींद्र वायकर, खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, आम. राजन साळवी, योगेश कदम, आम. निरंजन डावखरे, आम. प्रसाद लाड, खा. सुनील तटकरे, आम. ज्ञानेश्वर म्हात्रे, आम. शेखर निकम, किरण सामंत, जिल्हाधिकारी देवेन्द्र सिंह, जिल्हा परिषद मुख्याधिकारी किर्तीकिरण पुजार, पोलीस अधिक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सायंकाळी 4 वाजता शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे शिवव्याख्यान तसेच शाहीर रंगराव पाटील यांचा शिवशाही ते लोकशाही पोवाडा असे कार्यक्रम चिपळूण नगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विविध संघटना, मंडळे, मुस्लिम समाज यांच्याकडून शोभायात्रेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतूक मार्गावर बदल करण्यात आले आहेत. चिंचनाका ते मार्कडी तसेच लोकमान्य टिळक वाचनालय, पवन तलावा कडून पुढे जाणारा रस्ता हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.