गुहागर – स्वातंत्र्य दिनानिमित्त MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक जहूर बोट यांच्या सहकार्याने गुहागर व चिपळूण तालुक्यातील अनेक शाळा व कॉलेजमध्ये इ.९ वी ते १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ह्या परीक्षेचा कार्यक्रम MKCL आणि युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच उत्साहात संपन्न झाला. हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला.
या परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील गुहागर, अंजनवेल, पालपेणे, पाटपन्हाळे,शृंगारी उर्दू , पालशेत, जामसूत,शीर, तळवली,मुंढर,देवघर, व चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे इंग्लिश मिडियम, कालुस्ते, महाराष्ट्र, परांजपे, बांदल, गद्रे इ.शाळा व ज्युनियर कॉलेजने सहभाग नोंदविला.
ही परीक्षा काही क्रांतिकारी ,सत्याग्रह ,स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रश्नांवर घेण्यात आली. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर तर्फे प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन स्वातंत्र्यदिनी त्या त्या शाळांमधील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शाळा , कॉलेजचे मुख्यध्यापक, प्राचार्य व त्यांचे सहभागी विद्यार्थी तसेच उत्तीर्ण झालेलया सर्व विद्यार्थ्यांचे फ्लाईट एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शब्बीर बोट, युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक जहूर बोट, पर्यवेक्षिका पल्लवी शेट्ये , शिक्षिका सायली जाधव, सहायक शिक्षिका शिफा मालदोलकर इ. सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.