गुहागर – स्वतःच्या मालकीची जमीन असूनसुध्दा माझ्यावर दबाव आणण्यासाठी आबलोली येथील काही ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण करुन प्रशासन व ग्रामस्थांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून विनाकारण गावामध्ये तंटा घडविला जात असून मला नाहक त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप आबलोली येथील संदेश साळवी यांनी पत्रकार परिषदेत केला.
आबलोली येथील गट क्र. १५०५ ही जमीन येथील जमीन मालक शांताराम शिर्के यांच्याकडून मी घेतली. त्याची शासकीय जमीन मोजणी करुन घेऊन रितसर खरेदी खतही केले. यानंतर या जमिनीत शेतीपूरक काम करण्यास मी सुरुवातही केली. याचवेळी गावातील काही ग्रामस्थांनी मला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. जागेविषयी अपप्रचार करणे, भावनिक विषय करुन मला माझ्याच जमिनीत जाण्यापासून रोखणे, पायवाटा बंद करणे, बांध घालणे, शिमगोत्सव कार्यक्रमात जत्रेसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना जबरदस्तीने माझ्या जागेत बसण्यास भाग पाडणे, ग्रामस्थांना धमकावून माझ्याकडे येण्यास अटकाव करणे, सर्व प्रकारचा बहिष्कार टाकायला लावणे, शेतावर आलेल्या कामगार, मजुरांना धमकावून परत जाण्यास भाग पाडणे, संपूर्ण साळवी कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा व गावामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रकार काहींकडून सुरु असल्याचा आरोप साळवी यांनी केला. वास्तविक हा सर्व प्रकार न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.माझ्या गट क्र. १५०५ या जमिनीत कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. मात्र, या जमिनीत धार्मिक विधी होत असल्याचा अपप्रचार करुन लोकांची दिशाभूल करून समाजामध्ये माझी प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर लवकरच अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे संदेश साळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.