गुहागर – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये विविध कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून बजाज फिन्सर्व आणि पाटपन्हाळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्यावर आधारित सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग फिनान्स अँड इन्शुरन्सचे आयोजन केले आहे त्याचे उद्घाटन आणि 2024-25 ह्या वर्षाकरिता वाणिज्य मंडळाचे उद्घाटन अंजनवेल जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श् मंगेश गोरीवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही ना काही कौशल्य असतील तर तो नक्कीच पुढे जाऊ शकतो हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. प्रत्येक विद्यार्थ्याकडे विविध प्रकारच्या क्षमता असतात त्या ओळखून एक वेगळी स्पेस प्रत्येकाने निर्माण करणे आवश्यक आहे. या आधुनिक जगामध्ये या कौशल्याच्या आधारेच स्वतःला सिद्ध करा असे सांगितले. पुढील भविष्यकाळात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात कौशल्यांची गरज असणार आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे स्वयं मूल्यमापन करून आपल्या क्षमता ओळखून विविध कौशल्य आपल्याकडे कसे येतील हे पहावे. महाविद्यालयीन जीवनामध्ये संवाद कौशल्य, परदेशी भाषा कौशल्य, विपणन कौशल्य आणि संदेशवहन कौशल्य विद्यार्थ्याने आत्मसात करावेत की जेणेकरून कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये गेल्यानंतर ते मागे पडणार नाहीत.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख ही आपल्या आई-वडिलांच्या नावावर न करता स्वतःची ओळख निर्माण कशी होईल यासाठी महाविद्यालय जीवनापासूनच प्रयत्न करावे असे आवाहन केले. या कोर्समध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये नक्कीच विविध कौशल्य चांगल्या प्रकारे वाढतील आणि या प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य पुढील काळात नक्कीच चांगले असेल असा आशावाद करून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी शुभेच्छा दिल्या. या सर्टिफिकेट कोर्स साठी ज्ञानेश वैद्य (सांगली) नरहर देशपांडे (ठाणे) आणि मुमताज (गोवा) यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य देसाई यांनी विद्यार्थ्यांनी आताच्या काळात भविष्याचा वेध घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून आपले भविष्य उज्वल होईल हे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा साळवी आणि आभार प्रदर्शन दीक्षा चव्हाण हिने केले. या कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस एस खोत, प्रा. डॉ. प्रसाद भागवत तसेच घडशी आदी उपस्थित होते.