चिपळूण – चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित कुंभार्ली घाटाचा राजा – पर्व तिसरे राष्ट्रीय सायकल स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली. पुरुष खुल्या गटात कोल्हापूरचा सिद्धेश पाटील याने १२ किलोमीटरचा विशाल असा कुंभार्ली घाट फक्त ३६ मिनिट ४ सेकंद मध्ये सर केला. तर संपूर्ण स्पर्धेच्या २९ किलोमीटर अंतर साठी त्याला १ तास २ मिनिट ४१ सेकंद एवढा वेळ लागला. ही स्पर्धा जिंकत तो कुंभार्ली घाटाचा राजा या मानाच्या समजल्या जाणाऱ्या किताबाचा देखील मानकरी ठरला. गेली २ वर्षे तो या स्पर्धेत सतत दुसऱ्या स्थानावर राहत होता, मात्र, यंदा त्याने हा किताब आपल्या नावे करत स्पर्धेचे विजेतेपद व किताब दोन्ही पटकावले.
या सायकल स्पर्धेची वाढती लोकप्रियता पाहून यंदा देश विदेशातून मिळून एकूण ३२० सायकलपट्टू यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. जवळपास २० हुन अधिक राष्ट्रीय ४, आंतरराष्ट्रीय, तर २५ हुन अधिक राज्य स्तरावरील खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. सायकलिंग मधील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ३ खेळाडूंचा देखील यात समावेश होता. सदर स्पर्धा ही ५ श्रेणी मध्ये विभागली गेली होती.
पुरुष खुला गट सिद्धेश पाटील (कोल्हापूर), चिन्मय केवलरामानी (गोवा), सूर्या थातू (पुणे), तेजस धांदे (नागपूर), जिम हॅन्डर्सन(इंग्लंड)
पुरुष मास्टर (36-50 वयोगट)
विनायक गांवकर (गोवा), अल्बिनो अल्बुकर्क (गोवा ), अनुप पवार (मुंबई), अर्जुन पाटील (मिरज), सतीश सावंत (पुणे )
पुरुष -सिनियर (51+ वयोगट)
प्रशांत तिडके (पुणे ), रिचर्ड म्युलर (जर्मनी), संतोष पवार (पुणे ), संजय सातपुते (पुणे ), मरियान डिसूझा (गोवा )
पुरुष -लहान मुले
साईराज भोईटे (सातारा ), आर्यन जाधव(पलूस), राजवर्धन शिंदे (विटा), सुजल ओतारी(कोल्हापूर ), करण बाळ खाडे (सातारा )
महिला -खुला गट
योगेश्वरी कदम (सांगली), साक्षी पाटील (सांगली), नेहा टिकम(पुणे), जुई नारकर (मुंबई), श्रावणी परीट (चिंचवड)
या स्पर्धेत विट्याच्या ७ वर्षीय शिवतेज वांगणेकर याने राजू मोमीन सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार्ली घाट सर करुन सर्वात लहान रायडर ची नोंद केली. तर मुंबईच्या आर्यन कुलवडे – वय १० याने न थांबता सलग सायकल चालवत कुंभार्ली घाट सर केला.
७७ वर्षीय निरुपमाताई भावे व ७२ वर्षाचे श्री.गजानन भातडे यांनी देखील कुंभार्ली घाट या वयात सर केला. या सर्वांना चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सदर स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पटवर्धन, सह्याद्री निसर्ग मित्र चे भाऊ काटदरे, डॉ.अब्बास जबले, विनती ऑरगॅनिक्स तर्फे ढगे चिपळूण सायकलिंग क्लब चे डॉ.तेजानंद गणपत्ये यांची उपस्थिती होती. आपल्या मनोगतात डॉ.पटवर्धन म्हणाले की आजवरची सोनपात्रा मंदीर, कुंभार्ली घाट, आणि त्यामधले खड्डे ही घाटाची ओळख पुसून चिपळूण सायकलिंग क्लबने या घाटाला नवीन ओळख दिली आहे. घाटातल्या सायकलिंगचं हे आव्हान पेलण्यासाठी देशविदेशातून रायडर्स येतात हे या क्लबचं यश आहे. दरवर्षी शंभरहून अधिक रायडर्सची भर पडत आहे हे बघता पुढच्या वर्षी चारसो पार नक्कीच होतील अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतात दिल्या. सदर स्पर्धेला चिपळूण, लातूर, परभणी, मुंबई, पुणे व इतर भागातून सायकलप्रेमींनी मदत करताना स्पर्धा पार पडण्यासाठी आर्थिक बळ देऊ केलं त्याबद्दल या सर्व देणगीदारांचे चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.