रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशीच मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सावंत हे नॉट रिचेबल असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. असे असताना मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी किरण सावंत यांनी आपल्या कार्यालयातील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेले बॅनर हटवल्यानेही त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये किरण सामंत उदय सामंत यांच्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किरण सामंत यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते कुठे बाहेर गेले आहेत का किंवा काही तांत्रिक कार्यामुळे त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे का, असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून किरण सामंत हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र महायुतीत ही जागा भाजपला सुटली आणि नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर उदय सामंत व किरण सामंत यांनी दोन पाऊल मागे घेत आपला पाठिंबा राणे यांना जाहीर केला. मात्र आठवड्याभरापूर्वी पुन्हा एकदा किरण सामंत यांची नाराजी समोर आली. त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेला किरण सामंत उपस्थित राहिले होते. महायुतीकडून त्यांना सन्मानही देण्यात आला होता. या मतदारसंघात नारायण राणे यांच्या विजयाची मोठी जबाबदारी उदय सामंत व किरण सामंत यांच्यावर आहे. तर रत्नागिरीतून मताधिक्क्य मिळवून देण्याची जबाबदारी सामंत बंधूंकडे आहे. मात्र निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.