चिपळूण – ( मंगेश तावडे ) – रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत गेले आठ दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच रविवारी काही तरी निर्णय होईल या आशेवर चिपळुणातील महायुतीचे कार्यकर्ते होते. जागेबाबत निर्णय लागताच रविवार दणक्यात साजरा करण्याची योजनाही काहींनी आखली होती. मात्र, रविवारीही कोणताच निर्णय न झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा आहे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. एवढेच नव्हे तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणता पक्ष लढणार, हेच अजून निश्चित झालेले नाही. या जागेवर शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने शिंदेसेना या जागेसाठी आग्रही आहे, तर ही जागा भाजपला मिळण्यासाठी पक्षाच्या नेतेमंडळी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे भाजपच्याच चिन्हावर ही निवडणूक लढविली जावी, यासाठी आग्रह धरला आहे. दोन्ही बाजूंनी जागेचा विषय ताणला गेल्याने नक्की कोणता पक्ष निवडणूक लढणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.
गेले काही दिवस भाजप नेते नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित सांगण्यात येत आहे. त्याचवेळी शिंदेसेनेकडून किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, लढणार कोण, याचे उत्तर अनुत्तरितच आहे. नेत्यांच्या बैठकांनंतरही हा मतदारसंघ पोरकाच आहे; परंतु सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी शिमग्याचे ढोल वाजवले जात आहेत. रविवारी महायुतीच्या उमेदवाराबाबत घोषणा होईल, अशी आशा महायुतीच्या कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे रविवारीच शिमगा साजरा करण्याचा बेत काहींनी आखला होता. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा उमेदवारीच्या घोषणेकडे लागल्या होत्या. मात्र, रविवारीही उमेदवाराची घोषणा न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.