चिपळूण – चिपळूण शहरात गांजा विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी काही सार्वजनिक व अडगळीच्या ठिकाणी सातत्याने गस्त सुरु ठेवल्यांने गांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर चांगलाच परिणाम झाल्याची चर्चा आहे.
चिपळूण शहर परिसरात अनेक ठिकाणी राजरोसपणे गांजा व चरस ओढण्याचा प्रकार सुरु होता. दिवसा व रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी तरुणांचा घोळका एकत्र येऊन अंमली पदार्थ सेवन करीत होता, तरुण पिढी व मुले अशी व्यसनाधीन होत असल्याने परिणामी अनेक कुटुंबियाना त्रास सोसावा लागत आहे. जे तरुण व्यसनाच्या अधिन गेले आहेत ते आपले आई-वडील व कुटुंबियांनाही त्रास देत आहेत. अनेक कुटुंबियांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे. विरेश्वर कॉलनीत एका निर्माणाधिन इमारतीत चारजण गांजा ओढताना सापडल्याने या विषयाला वाचा फुटली. सामाजिक स्तरावर आवाज उठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई झाली. त्यामध्ये सातत्य राहिले आहे. शहर परिसरातील अनेक भागात असे व्यसनाधिन तरुण नदी किनारी असणारी झाडे झुडुपे, अर्धवट स्थितीत असलेल्या पडीक इमारती, काही निर्जनस्थळी आडोशाच्या ठिकाणी चरस, गांजा, औषधी गोळ्या व द्रव्ये व तत्सम प्रकारचे उत्तेजित करणाऱ्या अंमली पदार्थाचे खुलेआम सेवन करीत असतात. अंमली पदार्थ सेवनापासून शहराला वाचविण्यासाठी त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणारे आणि ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन केले जाते त्या ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई सुरु केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह ही कारवाई करीत असल्याने सध्या हे प्रकार नियंत्रणात आले आहेत. आपण हे धाडसत्र व छापेमारी सुरुच ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.