चिपळूण – चिपळूण शहरातील एका सदनिकेत वीज जोडणीचे काम करत असताना विजेचा जबरी झटका लागल्याने कापसाळ येथील प्रथमेश साळवी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली.
प्रथमेश हा शहरातील पागनाका येथील गृह संकुलातील सदनिकेत वीज जोडणीचे काम करत होता. हे काम सुरू असताना दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो बेशुद्ध पडला. त्याला काहींनी लागलीच कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.
प्रथमेश हा हरहुन्नरी, कष्टाळू होता. आयटीआय झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रिकल डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. घरी आई आणि दोन बहिणींसह राहणारा प्रथमेश इलेक्ट्रिकची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र, त्याच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रथमेशच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी शोक व्यक्त केला.