रत्नागिरी – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या किनारपट्टीवर जाणवत असून, गणपतीपुळे येथे किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांना लाटांचा दणका बसला. या लाटांमुळे येथील काही स्टॉलमध्येही पाणी शिरून विक्रेत्यांचे नुकसान झाले.
यंदा मान्सून लांबला असला तरी बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळला आहे. समुद्रात 10 ते 11 फूट उंचीच्या लाटा उसळत असून, याचा तडाखा किनारपट्टी भागाला बसत आहे.
रविवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास उधाणाच्या लाटेचा दणका गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांना बसला. येथील कठड्यावर हे पर्यटक बसले होते. अचानक आलेल्या लाटेने ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. तेथे असलेल्या अन्य लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. या घटनेत पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. या लाटेमुळे समुद्राचे पाणी नजीकच्या स्टॉलमध्येही शिरल्याने विक्रेत्यांचेही नुकसान झाले.
 
             
		
