पुणे – झी 24 तास वाहिनीतर्फे पुणे येथे सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समरोपाच्या सत्रात मार्गदर्शन केले. परिषदेतील चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि.चे संचालक तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनीही सहभाग घेतला.
सहकार चळवळीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. सुरुवातीला केवळ कृषी क्षेत्राशी निगडित असलेली सहकार चळवळ आता प्रक्रिया, विपणन, गृह, डेअरी, वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रातही सहकार चळवळीचा प्रसार वाढत आहे. परंतु यात अनेक क्षेत्र अद्यापही काही समस्याना तोंड देत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांचा सहकारातील प्रवास सुखकर होण्यासाठी आणि त्यांच्यासाठी संधीचे मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने झी 24 तासने सहकार परिषदेचे आयोजन केले होते. झी 24 तासचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी प्रस्ताविकात परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
या परिषदेतील दुग्धक्षेत्रावरील चर्चासत्रात वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि.चे संचालक तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील दुग्ध व्यवसायाचा आढावा मांडला. कोकणातील यापूर्वीची दुग्धक्षेत्रातील स्थिती आणि दुग्धक्षेत्रातील बदलती स्थित्यंतरे यासंदर्भात माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय म्हणून कोकणात दुग्धप्रकल्प उभा करण्यासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरी
ची संकल्पना कशी आकारात आली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पिंपळी खुर्दसारख्या छोट्याशा गावात वाशिष्ठी डेअरीचा अत्याधुनिक प्रकल्प कसा उभा राहिला हा अनुभव देखील यावेळी प्रशांत यादव यांनी कथन केला दुग्धक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आणि सरकारकडून अपेक्षा यावरही या सत्रात चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात डॉ. सुहास पाटील, स्वप्निल मोरे आणि गोपाळ म्हस्के सहभागी झाले होते. तसेच या परिषदेतील विविध चर्चासत्रात माजी मंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आरबीआयचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त अनिल कवडे, पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. झी 24 तासचे संपादक नीलेश खरे यांनी चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह आणि रोपटे देऊन सन्मान केला.