बातम्या शेअर करा

खेड – शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवल्या प्रकरणी आज खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला ही शिक्षा ठोठावण्यात आली.

खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील ती सापडली नाही म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका इसमाच्या घरा जवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले होते.पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांत याने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली.

खेड पोलिसांनी सूर्यकांत याला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६ (आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला.
खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग १ येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. कोकण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहीत कुमार गर्ग यांनी सहकार्य केले
सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश वर्ग १ श्री डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व वित्त दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here