चिपळूणमध्ये ५ मार्च रोजी लोककला गौरव सोहळा

0
121
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकण व्हिजन फाऊंडेशनसह कोकण रिपोर्टर आणि सह्याद्री समाचार या माध्यमांतर्फे लोककला गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष व उद्योजक प्रशांत यादव, वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकासअण्णा जाधव, उद्योजक आणि एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन चंद्रकांत भोजने, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कलगीतुरा समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्त्रबुद्धे, नमन लोककला संस्था अध्यक्ष रवींद्र मटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, पत्रकार मकरंद भागवत, पत्रकार शाहिद खेरटकर यांनी दिली.
आयुष्यभर लोककलेची सेवा करणाऱ्या लोककलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जाखडी प्रकारात शाहीर तुषार पंदेरे, शाहीर रामचंद्र घाणेकर, शाहीर अर्जुन भुवड, नमन प्रकारामध्ये चंद्रकांत पालकर, संदीप कानसे, बावा भागडे, सुधाकर गावणकर, भिकाजी चोगले, पालखी प्रकारात पद्मावती पालखी नृत्य कलापथक मार्गताम्हने, भेदीक शाहिरीमध्ये शाहीर गोपाळ वाजे, कीर्तन प्रकारात रुपेश महाराज राजेशिर्के, जलसा प्रकारात वैभव कला जलसा मंडळ, ओंमळी, गोंधळ प्रकारामध्ये शंकर यादव, काटखेळेसाठी चंडिका देवी जुने मंदिर खेर्डी(ता.दापोली)कलापथक या सर्वाना ‘लोककला भूषण’ पुरस्कार तर शिवन्या मांडवकर यांना लोककला प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आयुष्यभर जाखडी या लोककलेच्या प्रचार- प्रसारासाठी विशेष प्रयत्न करणारे आणि तिला एक नवा आयाम देणारे शाहीर दत्ताराम आयरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. याबरोबरच गेली ४२ वर्षे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहून अनेकांना मदतीचा हात देणारे चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना याच सोहळ्यामध्ये ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. आयुष्यभर लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि समाज प्रबोधन करूनही आज आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असणाऱ्या काही लोककलावंताना यावेळी यथाशक्ती आर्थिक मदतीचा हातही दिला जाणार आहे.
या गौरव सोहळ्यात ‘झलक लोककलांची’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार असून रविवार दिनांक ५ मार्च रोजी शहरातील लक्ष्मीबाई बांदल हायस्कूलच्या सभागृहामध्ये सकाळी १० वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मकरंद भागवत, राजेंद्रकुमार शिंदे आणि शाहिद खेरटकर यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here