महापारेषणला केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे सर्वोत्तम राज्य पारेषण कंपनी म्हणून पारितोषिक

0
180
बातम्या शेअर करा

मुंबई- नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाने (सीबीआयपी) नुकतेच विविध पुरस्कारांचे वितरण केले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) देशातील सर्वोत्तम राज्य पारेषण कंपनी म्हणून पारितोषिक मिळाले. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व महापारेषणचे संचालक (प्रकल्प) नसीर कादरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचे (सीबीआयपी) अध्यक्ष घनश्याम प्रसाद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


अखंडित वीज पारेषण करताना वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वीजहानी कमीत-कमी ठेवणे, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल उपकेंद्रांची उभारणी, भौगोलिक माहिती प्रणाली व अति उच्च दाब केबलचा वापर करणे, दुर्गम भागात विजेची देखभाल करण्यासाठी ड्रोनचा वापर, दरवर्षी वीजजाळ्यांची उभारणी करणे, देशात सर्वात जास्त भार (Load MW) वर्षभरात सर्वात जास्त वीज पारेषण करणे यासाठी हे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच या सांघिक पुरस्काराव्यतिरिक्त महापारेषणला पाचपैकी दोन वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये उपकार्यकारी अभियंता श्री. वसंत पाटील यांना महापारेषण जळगाव विभागातील १३२ के. व्ही. तळोदा-धडगाव वाहिनी डोंगरदऱ्यात असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मनोरे उभे करून वाहिनीची कामे वेळेवर पूर्ण करुन धडगाव येथे पूर्ण क्षमतेने उपकेंद्र कार्यान्वित केल्याबद्दल त्याना बेस्ट यंग पॉवर इंजिनिअर पुरस्कार मिळाला. दुसरा वैयक्तिक पुरस्कार महापारेषण कोल्हापूरचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पुजारी यांना डिजिटल व ऑटोमेशन क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बेस्ट यंग पॉवर इंजिनिअर म्हणून वैयक्तिकरित्या पारितोषिक मिळाले

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय टीमवर्कला दिले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कामांमुळेच महापारेषणला हे पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. भविष्यातही महापारेषणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here