चिपळूण – गुहागर-चिपळूण महामार्गावरील मिरजोळी येथे एका हातगाडीला ओव्हरटेक करणाऱ्या एस.टी. बसने समोरून येणाऱ्या लाईफ केअर रुग्णालयाच्या कर्मचारी वाहतूक करणाऱ्या इको कारला धडक दिल्याने कारमधील तीन प्रवासी जखमी झाले तर अन्य चारजणांना मुकामार लागला आहे.
चिपळूण आगारातून चालक अजय जगदिशराव अहेर हे चिपळूण-कळवंडे ही बस घेऊन जात असताना मिरजोळी साखरवाडी येथे एका हातगाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या लाईफ केअरच्या इको कारला जोरदार धडक दिल्याने कारचे ७० हजार रूपये नुकसान झाले. कारमध्ये सकाळी कामावर येणारे श्रद्धा पवार, संतोष पेवेकर, रसिका फांगे, रसिका कदम, सुकेशिनी धोत्रे, राजन जाधव व चालक संजय जांभळे असे सात कर्मचारी होते. त्यातील श्रद्धा पवार, रसिका फागे, रसिका कदम या तिघी जखमी झाल्या आहेत. या अपघाताची खबर कारचालक संजय जांभळे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून एस.टी. चालक अजय जगदिशराव अहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.