चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतने उपसरपंच व अन्य पाच सदस्यांना विश्वासात न घेता खासदार निधीतील बील परस्पर अदा करण्यात आले. या प्रकाराबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून विरोध दर्शवत कामाची चौकशी करूनच बील अदा करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंचसह सदस्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत मजूर संस्थेला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराविरोधात उपसरपंच व अन्य पाच सदस्यांनी येथील पंचायत समिती समोर प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
मिरजोळी येथे खासदार हुसेन दलवाई यांच्या निधीतून सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेली कामे पूर्ण करण्याच्या पद्धतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने कार्यारंभ आदेशाप्रमाणे कार्यवाही न करता मक्तेदार मजूर संस्थेची निवड करून मनमानी पद्धतीने कारभार केला. ग्रामपंचायतमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद न करता परस्पर वर्कऑर्डरही दिली असल्याचे समोर आले आहे. या कामाची मुदत सहा महिने असताना मक्तेदार मजूर संस्थेने दोन ते अडीच वर्षे कामाला सुरुवात केली नव्हती. सदरील काम सुरू असताना सन २०२०-२१ मध्ये मिरजोळी ग्रा.पं.वर नवीन कमिटी अस्तित्वात आली. तर जानेवारी २०२२ मध्ये हे काम पूर्ण झाले. यामुळे विद्यमान ग्रामपंचायत कमिटीला मजूर संस्था व सचिव (ग्रामसेवक) यांनी विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र, मजूर संस्थेने फक्त विद्यमान सरपंच कासम दलवाई यांच्याशी संगनमत करून कामाच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यास सहकार्य केले. त्यानंतर सरपंच यांनी सदरच्या कामाची बिलाची रक्कम कशा प्रकारे देण्यात यावी अगर कसे याबाबतचे मार्गदर्शन मिळावे याबाबत पाठपुरावा करत होते. सदरची कामे योग्य कार्यपद्धतीचा अवलंब झालेला नसल्यामुळे ग्रामपंचायतचे उपसरपंच व पाच सदस्य यांची मागणी होती की, सदरच्या कामाची चौकशी करून मक्तेदार यांना बील अदा करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे पत्र प्रशासनाला दिले होते.
तरीही पंचायत समिती अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांनी असे आदेश दिले की, सदर कामाचे बील त्वरीत संबधित मजूर संस्थेला प्रथम अदा करावे आणि त्यानंतर सदर कामाची चौकशी करण्यात येईल. सदर कामाच्या बाबतीत चौकशी होण्याअगोदर कामाचे बिल मक्तेदार यांना अदा करावे, अशा प्रकारचे पत्र ग्रामपंचायतकडे पाठवून ग्रामपंचायत सदस्यावर दबाव आणत आहेत. याअर्थी उपसरपंच व सदस्यांच्या म्हणण्याला प्रशासन दाद देत नसल्याचे समोर येत आहे. या विरोधात मिरजोळी ग्रामपंचायत उपसरपंच गणेश निवाते व पाच सदस्य यांनी चिपळूण पंचायत समिती कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.