गुहागर– गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठेका मिळविण्यासाठीच शिंदे गटात गेले असून याचा त्यांनी माझ्याशी वैयक्तिक खुलासा केल्याचे स्पष्टीकरण शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केले.
तसेच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील सर्वच एकूण २१ ग्रा.पं. वर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.आबलोली पंचक्रोशीतील काही सरपंच शिंदे गटात गेल्याबाबत पत्रकारांनी तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना आज झालेल्या पत्रकार परिषदेत विचारणा केली. यावेळी त्यांनी सर्व गोष्टींचा खुलासा केला. कित्येक शिवसैनिक मला आजही फोन करुन भेटून त्यांचे म्हणणे मांडत आहेत. आम्हाला भास्कर जाधव यांच्यावर विश्वास आहे. कुणावरही राग नाही. आम्हाला पोटापाण्यासाठी काहीतरी कामे किंवा ठेके मिळावीत, यासाठी आम्ही शिंदे गटात गेल्याचे सांगत आहेत. आपले संबंध कायम राहतील असेही बोलत आहेत. त्यातील काहीजण हुशार व समंजस्य आहेत ते शिंदे गटात जायचे की नाहीत याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यात शिंदे गट टिकणार नाही. या गटात जाणाऱ्यांना त्याचा प्रत्यय नक्की येईल.मध्यंतरी आमदार भास्कर जाधव यांनी ग्रा.पं. निवडणुकासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी २१ ग्रा.पं.च्या निवडणुका कशा लढायच्या याबाबत ठरविण्यात आले. जेथे बिनविरोधची परंपरा आहे तेथे बिनविरोध व्हाव्यात, जेणेकरुन गावपातळीवर वाद नकोत, अशी समजंस्य भूमिका घेण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे संकेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच दिले आहेत. माजी खा. अनंत गीते यांनीही तसे सांगितले आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे येतील, असा आत्मविश्वास बाईत यांनी व्यक्त केला.आबलोली पंचक्रोशीतील उद्ध्व बाळासाहेब ठाकरे गटाचे बारा ते तेरा सरपंच पालकमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. मात्र, हे सरपंच मासू ते भातगाव रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात व विकासाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना भेटायला गेले होते. याचे त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदनही दिले असल्याचा खुलासा यावेळी तालुकाप्रमुख बाईत यांनी केला. पालकमंत्र्यांना भेटणे गैर नाही. मात्र, चुकीच्या पध्दतीने शिंदे गटात गेल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. याचे खंडन करणे आवश्यक आहे. यातील काही सरपंच येथे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला तालुका सचिव विलास गुरव, उपतालुकाप्रमुख काशिनाथ मोहिते, उपविभागप्रमुख बाबा वैद्य, ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ उकार्डे, जांभारी सरपंच अंकुश माटल, गोळेवाडी सरपंच सौ. रेणुका आग्रे, उप महिला आघाडी व शिवणे ग्रा.पं. सदस्य सौ. सुषमा रायकर, माजी शाखाप्रमुख व आवरे उपसरपंच प्रकाश काताळकर आदी उपस्थित होते.