खेड – खेड तालक्यातील लोटे औद्योगीक वसाहतीत भंगार साहित्याची चोरी हा विषय काही नवा नाही. लहान मोठ्या भंगार साहित्याच्या चोऱ्या होतच असतात मात्र आता एक मोठी भंगारचोरी उघडकीस आली आहे.
लोटे औद्योगीक वसाहतीच्या बंद पडलेल्या दोन कारखान्यातुन सुमारे ३ कोटीच्या लोखंडी साहित्यावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या या भंगार चोरी बाबत तब्बल तीन वर्षानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांसह अनेक मोठे मासे गुंतले असल्याची चर्चा आहे. खेड पोलिसात वैभव विलास आंब्रे यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी ता. २० नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल पॅगोडा येथे राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची पत्रकार परिषद झाली होती. तेव्हा रामदास कदम यांनी पत्रकारांना या चोरीबाबत माहिती देत सीआयडी चौकशी लावणार असल्याचे सांगितले होते. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतरच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या एफ आय नुसार लोटे औद्योगीक वसाहतीतील प्लॉट नं सी /४१ इंडी ड्युट मेटॉलो केमिकल्स प्रा.लि व प्लॉट नं सी /४२ मिशाल झिक डंड्रस्टिज प्रा.लि या दोन बंद कंपन्याचे साहित्य १)विश्वास एन्टरप्रायजेस मो.नं असलेल्या क्रेनचा चालक मालक २) ट्रकचा क्रमांक एम.एच १२ इक्युव ९४७१ चा चालक मालक ३) ट्रकचा क्रमांक एम.एच ५० /१४८७ चा चालक मालक ४) हेव्हील लिफ्टर या क्रेनचे चालक मालक ५) ) ट्रकचा क्रमांक एम.एच ०८ एच ०९८७ चा चालक मालक ६) मुन्ना सिंग रा.चिपळुण ७) आसिफ मेमन रा.चिपळूण ८) व अन्य स्थानिक पुढारी यांनी एकमेकांच्या संगनमताने चोरल्याचा आरोप आहे. इमारतीची तोडफोड करुन कंपनीतील मशिनरी व इतर लोखंडी साहीत्य गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन ट्रक मध्ये भरुन चोरुन नेल्याचे पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एकाद्या कंपनीत राजरोपणे शिरून कंपनीतील साहित्य गॅस कटरच्या साह्यायाने कट करून ते चोरून नेणे सहज शक्य नसल्याने यामध्ये अनेकजण गुंतले असावेत असा संशय आहे. एवढी मोठी चोरी ही एका दिवसात झालेली नाही. कित्येक दिवस हा चोरीचा प्रकार सुरु असावा मग या चोरीचा सुरक्षा यंत्रणांना सुगावा कसा लागला नाही हा संशोधनाचा विषय आहे. ज्या कारखान्यातील साहित्य चोरीला गेले त्या कंपनी मालकांनी देखील आपल्या कारखान्यातील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार का दाखल केली नाही. हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल पॅगोडा येथे माझी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोट्यावधीचा चोरीची माहिती पत्रकारांना देऊन सी आय डी चौकशी लावण्याची घोषणा केली. त्यानंतर चक्र फिरली आणि तब्बल तीन वर्षानंतर खेड पोलिसात चोरीची तक्रार दाखल झाली. पोलिसात जी फिर्याद दाखल झाली आहे. त्या फिर्यादीत चोरी करताना वापरण्यात आलेल्या वाहनांचे क्रमांक देऊन त्या वाहनाचे चालक मालक असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय स्थानिक पुढारी असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात नक्की कोणाकोणाची सहभाग आहे. हे अदयाप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण येथील मुन्ना सिंग, आसिफ मेमन ही दोन नावे आरोपींच्या यादीत आहेत. अन्य आरोपी कोण आहेत हे आता पोलिसांना शोधून काढायचे आहे. इंडी ड्युट मेटॉलो केमिकल्स प्रा.लि व प्लॉट नं सी /४२ मिशाल झिक डंड्रस्टिज प्रा.लि या दोन कंपन्यांमध्येमधून लाखो रुपये किंमतीचे मोठे लोखंडी चॅनेल,लोखंडी ट्रॅक, रिऍक्टर बॉयलर,लोखंडी चिमण्या, कंपनीच्या मशीनरी , लोखंडी शेड लोखंडी भट्टी,लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर कंपनीचेजुने साहित्याची मिळून सुमारे तीन कोटींची चोरी करण्यात आली आहे. लोटे औद्योगीक वसाहतीतील ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी भंगार चोरी मानली जात असून या चोरीचा छडा लावून आरोपीना गजाआड करणे खेड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.