मंडणगड – एस.एम.ग्लोबल नावाच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंडणगड पोलीस स्थानकात ६० लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करताना हा आकडा ९६ लाखांपर्यंत पोहोचला आहे. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत एस.एम. ग्लोबल कंपनी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत यश घोसाळकर यांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी मंडणगड पोलिस स्थानकात प्रथम फिर्याद दाखल केली. ही फिर्याद दाखल..
होताच मंडणगड पोलिसांनी कारवाई सुरू करून ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मंडणगड नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक हरेश मर्चंडे (रा. मंडणगड), परेश वणे, नीलेश रक्ते (रा. पाले) या तिघांना अटक केली आहे. यश घोसालकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये सुमारे ६० लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच फसवणुकीचा आकडा सुमारे ९६ लाखांपर्यंत पोहोचला आहे.
मंडणगडसह दापोली, खेडमध्ये काहींची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे हा आकडा काही कोटीत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये शिक्षक, पोलीस, निवृत्त कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्यासह नागरिकांचाही समावेश आहे. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये निम्म्याहून अधिक शासकीय कर्मचारी असल्याने तक्रार दाखल करण्यास कोणी समोर येत नाहीत. मात्र, पोलिसांनी तक्रारीसाठी पढे येण्याचे आवाहन केले आहे.
एजंटांनी तालुका सोडला
कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांनाही कंपनीचा एजंट बनवण्यात येत होते. त्यामुळे गुंतवणुकीबरोबरच एजंट होऊन अधिक कमाई करण्यासाठी अनेक एजंटही झाले आहेत. अशा एजंटांना धडकी भरली आहे. त्यामुळे अनेकांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. तर अनेक जण तालुका सोडून गेल्याची माहिती पुढे येत आहे.