मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. विशेष म्हणजे शिवसेना नेमकी कुणाची ते आता जनसागर पाहून सांगायची गरज नाही, असं ते म्हणाले.
इथे अथांग जनसागर उसळला आहे. खरी शिवसेना कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रालाच नाही तर भारताला या जनसागराने दिले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसादर कोण आहेत? मला वाटतं यापुढे असा प्रश्न कुणालाही पडणार नाही हे आपल्या या गर्दीने सिद्ध केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलंत. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण मी ठरवलं होतं की मैदान देण्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. सदा सरवणकर यांनी सर्वात आधी अर्ज केला होता. मैदान मिळालं असतं. पण या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. मला सांगायचं काय ते तुम्हाला कळलं आहे. मैदान जरी तुम्हाला मिळालं असलं तरी शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे आणि ही परंपरा तुम्ही मोडीत काढलीत, अशी टीका शिंदेंनी केली.सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. मग सांगा तुम्हाला त्या जागेवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार मिळतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार उरलाय का? हजारो शिवसैनिकांनी आपलं घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकार आणि पक्षाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला, त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.
















