खेड – गेले काही दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे ज्या ठिकाणी महामार्गाचे क्रॉक्रिटीकरण झालेले नाही त्या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून यातून मार्ग काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
भरणे नाका येथील जगबुडी आणि उड्डाण पूल या दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे आहेत मात्र ठेकेदार किंवा महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर दार दोन दिवसाआड होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. खेड तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या ४४ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रुक्चर या कंपनीने घेतला आहे. चौपदरीकरणाचे काम वेळेत आणि दर्जेदार करण्याचे आश्वासन या कंपनीने दिले होते. मात्र सद्य स्थितीत महामार्गाच्या कामाचा दर्जा पहिला तर ठेकेदार कंपनीने चुना लावल्याचे स्पष्ट होत आहे. भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या अप्रोच रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. पडलेल्या खड्ड्यातून वाहने कशी चालवायची हा प्रश्न वाहनचालकाना पडतो आहे मात्र ठेकेदार किंवा महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याच्या दुरावस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पाण्यामुळे खड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे रिक्षा, दुचाकी, कार अशी हलकी वाहने खड्ड्यात आदळून लहान-मोठे अपघात होऊ लागले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याच्या प्रयन्त केला तर अधिकार कायम नॉट रिचेबल असतात तर ठेकेदार कुठे आहे हे कुणालाच माहित नाही त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एखादा जीवघेणा अपघत झाला तर त्याला जबाबदार कुणाला धरायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरणे नाका येथील जगबुडी पुलाच्या अप्रोच रोडवर रस्त्याची जी अवस्था आहे तीच अवस्था खोपी फाटा येथील रस्त्याची आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत . या खड्ड्त्यात साचलेले पाणी वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. अंगावर अनपेक्षित अभिषेक झाला कि पादचाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होत आहे पण हे सारे सांगायचे कुणाला? पादचारी किंवा वाहन चालक यांच्या तक्रारी ऐकायच्या कुणी? हा खरा प्रश्न आहे. ठेकेदार कंपनीने केलेले काँक्रिटीकरणाचे कामही दर्जेदार झालेले नाही. अनेक ठिकाणी पहिल्या पावसातच रस्त्याला तडे गेलेले आहेत. दाभीळ उड्डाण पूल तर एका ठिकाणी खचला असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जिथे हा पूल खचला आहे तिथे वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी होती मात्र तशी काहीच उपाययोजना न केल्याने रात्रीच्या वेळेत इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून अनेक अपघात झालेले आहेत. यातील बहुतांशी अपघात हे ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहेत. यामध्ये काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र तरीही ठेकेदार कंपनीवर कोणतीही कारवाई होत नसल्यानबे आश्चर्य व्यक्त होत आहे.