चिपळूण – शिवसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी गतवर्षीच्या महापुरात चिपळूण वासीयांना मदत करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा भला मोठा बॅनर लावल्यावरून येथील शिवसेनेत घमासान सुरू आहे.
या बॅनरशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही असे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी स्पष्ट केले आहे तर उमेश सकपाळ यांनी शिवसेना की शिंदे गट याबाबत एकदाच काय ती भूमिका स्पष्ट करावी अशी सूचना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केली आहे. २२ जुलै २०२१रोजी चिपळूण शहर आणि परिसराला महापुराचा विळखा पडला आणि अपरिमित अशी हानी झाली होती. त्याच्या आठवणी ताज्या असतानाच , ते भयावह दोन दिवस नागरिक विसरले नसतानाच शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बॅनर लावल्याने शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. सकपाळ यांनी हा भव्य बॅनर शहराच्या मध्यवर्ती भागात नागरपालिकेसमोरील खेडेकर क्रीडा संकुल येथे लावल्याने तो संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला. या बॅनरमुळे शिवसेनेच्या गोटातही खळबळ उडाली. याबाबत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली त्यात या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाप्रमुख कदम यांच्या आदेशानुसार सदरचा बॅनर शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आला, मात्र हा बॅनर फाडण्यात आल्याच्या समाजातून काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनीही लगेच धाव घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली.या सर्व घटनेसंदर्भात चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. या बॅनरशी शिवसेनेचा काडीचाही संबंध नसून तो बॅनर फाडण्यात आला नाही तर त्यावर बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आमच्या नेत्यांचे फोटो वापरण्यात आल्याने तो काळजीपूर्वक काढून ठेवण्यात आला असे कदम यांनी सांगितले. महापुराच्या संकटात असंख्य ज्ञात अज्ञात लोकांनी, संस्थांनी, नेत्यांनी चिपळूणला प्रचंड प्रमाणात मदत केली असे असताना केवळ एकनाथ शिंदे यांनीच मदत केली असे दाखवून त्याबाबत बॅनर लावण्याचा हेतू काय असा प्रश्नही बाळा कदम यांनी विचारला आहे. जर कृतज्ञाता व्यक्त करायचीच होती तर सर्वांप्रति करता आली असती, पण केवळ शिंदे यांचा मोठा फोटो छापून बाकीच्या मदत करणाऱ्यांचा अपमान करण्याचाच हा प्रकार आहे अशी टीकाही कदम यांनी केली. शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्या बाबत जिल्हाप्रमुख किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य ती कारवाई करतील असे बाळा कदम यांनी सांगितले. दरम्यान, काल रात्री काढण्यात आलेला बॅनर आज शनिवारी सकाळी पुन्हा त्याच जागी उभा करण्यात आला असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बॅनर पालिकेची परवानगी घेऊन लावण्यात आला आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.उमेश सकपाळ यांनी आत्तापर्यंत दोनतीन वेळा शिंदे यांच्या समर्थनार्थ कृत्य केले आहे त्यामुळे त्यांनी आता स्वतःहूनच आपण नक्की कोणाशी एकनिष्ठ आहोत ते स्पष्ट करावे. असे संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये असा सल्ला जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिला आहे.