चिपळूण -मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणनजीकचा परशुराम घाट हा दरडग्रस्त झाल्याने त्याचा सर्वांत जास्त फटका एसटीला बसत आहे. घाट बंद ठेवल्याने प्रामुख्याने चिपळूण आगारातील एसटी सेवा प्रभावीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेतच, पण चिपळूण आगाराचे होणारे आर्थिक नुकसानही मोठे आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी परशुराम घाट फोडण्याचे काम चालू आहे. हे काम चालू झाल्यापासून परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. घाटातील तीन ते चार ठिकाणे धोकादायक बनली आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात घाटातील दरड पायथ्याशी असलेल्या पेढे गावातील वस्तीवर कोसळल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही घरांचे नुकसान झाले होते. आजही येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. एप्रिलमध्ये घाटात डोंगर तोडण्याचे काम चालू असताना दरड कोसळल्याने डंपर, जेसीबी गाडला जाऊन एका कामगाराचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर महिनाभर घाट दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेऊन घाटातील काम गतीने करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, असे असले तरी पाऊस सुरु होताच दरडी कोसळण्याचे प्रकार वाढतेच आहेत.
गुहागर, देवरुख, राजापूर, रत्नागिरी आगारातील गाड्यांची सेवाही प्रभावित चिपळूण आगाराबरोबरच याच मार्गाने जाणाऱ्या गुहागर, देवरुख, राजापूर, रत्नागिरी आगारातील एसटी गाड्यांची सेवाही प्रभावीत झाली आहे. पर्याय म्हणून चिरणी-कळंबस्ते मार्ग हा अरुंद आणि गावातून येणारा असल्याने वाहतुकीवर खुपच मर्यादा येत आहेत. त्यामुळे खेड, मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठा तोटा होत आहे.
नुकसानीचे सत्र सुरुच
दीर्घकाल चाललेल्या संपामुळे चिपळूण आगाराला सुमारे पाच कोटींचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातून संप मिटून एसटी वाहतूक सुरु होऊन थोडीफार घडी बसत असातानाच एप्रिल-मे महिन्यात घाट दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा आर्थिक नुकसान होऊ लागले. त्यानंतर जून महिन्यात वाहतूक सुरळीत चालू असताना आता जुलै महिन्यात दोन वेळा दरड कोसळळी. त्यामुळे घाट बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चिपळूण आगार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.
चिपळूण आगाराचे ४० लाखांचे नुकसान?
सतत दरड कोसळून घाट बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे अवजड वाहतुकीबरोबरच एसटीला मोठा फटका बसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात दोन वेळा दरड कोसळल्याने ९ जुलैपर्यंत घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे चिपळूण आगारातून मुंबई, पुणे, बोरिवली तसेच खेड, दापोली, मंडणगड या मार्गावरील एसटीच्या जवळपास शंभर फेऱ्या ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे किमान ४० लाखांचे नुकसान होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. चिपळूण आगारातून या विविध मार्गावर सुमारे साडेपाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करतात.