चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे दहा दिवसात भरा नाहीतर, या खड्ड्यांमध्ये भात लावणी करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली.
सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. काही वर्षापासून परशुराम ते आरवली मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत; मात्र या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती वालोपे रेल्वे स्टेशनपासून सावर्डे, आगवेपर्यंतच्या सर्विस रोडवर आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. मोठे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.