गुहागर – दोन वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या शृंगारतळी – गुहागर मार्गावरील बहुचर्चित मोडकाघर पुलाच्या संरक्षक कठड़्यालाच मोठे भगदाड पडल्याचे दिसून येत आहे.
गुहागर-विजापूर रस्तारुंदीकरणातील या निकृष्ट कामाचे जागृक नागरिकांकडून पोलखोल केली जात असून अशा कामांची दुरुस्ती ठेकेदार किती दिवस दुरुस्ती करत बसणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.गुहागर तालुक्याच्या दळणवळणात व सर्वांगीण विकासात भर घालणारा मोडकाघर पूल गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात बरीच वर्षे चर्चेचा विषय ठरला होता. त्याची दुरुस्ती होण्यापूर्वी हा पूल एका बाजूने खचला होता त्यामुळे काही महिने एकेरी वाहतूक तर खूपच धोकादायक झाल्यावर जवळपास वर्षभर तो वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे गुहागरकडे ये-जा करणारी वाहतूक शृंगारतळी, पालपेणेमार्गे अंजनवेल फाटा करीत सुरु करण्यात आली होती. यानंतर रस्ता रुंदीकरणातही मोडकाघर पुलाच्या उभारणीकडे पाहिजे तसे लक्ष देण्यात आले नाही. हा पूल उभारणीसाठीही बराच विलंब ठेकेदाराने लावला होता. यामध्ये थोडे राजकारणही आडवे आल्याची चर्चा सुरु होती.मोडकाघर पूल नव्याने बांधल्यानंतर दोनही बाजूने मजबूत सीमेंट काँक्रीटचे संरक्षक कठडे दोनही बाजूने बांधण्यात आले. यातील एका कठड्याला उभे मोठे भगदाड पडलेले दिसून येत आहे. दोन वर्षातच निकृष्ट बांधकामाचे उत्कृष्ट नमुने असे समोर येत असल्याने रस्ता रुंदीकरणातील कामे चर्चेत आलेली आहेत. तसेच गटारांची बांधकामे, काँक्रीटला तडे जाणे, रस्त्यावर भेगा पडणे असे प्रकार सुरुच आहेत. यांची पुन्हा पुन्हा दुरुस्ती ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. एकूणच दर्जाहीन कामामुळे ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणातील कामातून नेमके काय साध्य केले अशी शंका उपस्थित होत आहे.