चिपळूण – जागतिक पर्यावरण दिनी व वटपौर्णिमेच्या दिवशी ५ जून २०२० रोजी लेक वैदेहीचा जन्म झाला म्हणून तो इतरांसारखा साजरा न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करणाऱ्या चिपळूण मधील पोलिसातल्या एका ‘बाप’माणसाची आजच्या पर्यावरण दिनी मोठी चर्चा सुरु झाली आहे.
आशिष बल्लाळ असं या निसर्गप्रेमी बापाचं नाव आहे. त्यांच्या मुलीचा वैदेहचा जन्म मुंबई येथे पर्यावरण दिनी झाला. निसर्गावर अतोनात प्रेम करणा-या माझ्यासारख्या निसर्गवेड्या माणसाला निसर्गाने जागतिक पर्यावरण दिनी मला मुलीच्या रूपाने अनमोल भेट दिली, असंच ते मानतात. आमच्या कोकणातील पूर्वजांनी निसर्गाचे दान जपले म्हणुनआमच्या पिढीला त्याचा आनंद घेता आला. आता आमच्या पिढीनेनिसर्ग जपायची वेळ आली आहे. वैदेहीच्या वाढदिवसानिमित्त मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फी वड व पिंपळाची रोपटी लावण्याचा निश्चय केला होता. परंतु अजूनही महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले नसल्याने तिथे वृक्षारोपण केले तर झाडांना नुकसान होऊ शकते म्हणुन तिथे वृक्षारोपण न करता महामार्गाशेजारी वसलेल्या चिपळुण तालुक्यातील पाचांबे पुनर्वसन या नव्या शासकीय वसाहतीत वड व पिंपळाच्या झाडांचे वैदेहीच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बल्लाळ यांनी वृक्षारोपण केले. आपण या पावसाळ्यात भारतीय झाडांचे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा आत्मा इथला निसर्ग आहे आणि माझ्या मुलीनेही हा निसर्ग जपायला हवा, त्याचा आदर करायला हवा म्हणून मी लहानपणापासुन तिच्यावर संस्कार करीत आहे. तिच्या इवल्याशा हातांनी लावलेले वटवृक्षाचे रोप पुढच्या कित्येक पिढ्यांचे साक्षीदार होवो ही इच्छा असल्याचे आशिष बल्लाळ सांगतात.