मालवण – मालवण किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा व्यवसाय २५ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेली अनेक दिवस सुरू असलेल्या मालवणच्या किनारी पर्यटन हंगामाला आजपासून ‘ब्रेक लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पर्यटन हंगामाच्या सरते शेवटी तारकर्ली समुद्रात बोट बुडल्याची दुदैवी घटना घडली आणि मालवणच्या पर्यटनाला गालबोट लागले. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथे भेट दिली. यादरम्यान पर्यटन बोटींवर लाईफ जॅकेट वापरले जाते का? याची पाहणी केली. याप्रसंगी बंदरनिरीक्षक आर. जे. पाटील, बाळासाहेब कदम हे उपस्थित होते.
25 मे ते 31 ऑगस्टपर्यंत साहसी जलक्रीडा प्रकार बंदच राहणार असून, किल्ला प्रवासी वाहतूकदेखील बंद राहणार आहे. किल्ला प्रवासी संघटनेने वातावरणानुसार मुदतवाढ देण्याची मागणी केली असली तरी मुदतवाढ देण्याचे अधिकार हे वरिष्ठ कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे याबाबत मुबंई येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी निर्णय घेतील.