चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने बुद्रुक घाणेकरवाडी येथे रस्त्यातच एका घराचे बांधकाम करण्यात आले आहे या बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश प्रशासनाला केल्या आहेत परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत येथील ग्रामस्थ सीताराम घाणेकर यांनी सांगितले की, मार्गताम्हणे येथील बाजारपेठेपासून घाणेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर यशवंत बाळू भडवळकर यांनी घराचे बांधकाम केले जात आहे. या घराच्या परवानगीसाठी त्यांनी 2010 मध्ये ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. 25 बाय 25 फूट लांबी रुंदीच्या घराला परवानगी देताना ग्रामपंचायतीने रस्त्याची जागा सोडून घराचे बांधकाम करण्याची अट घातली होती. तरीही भडवळकर यांनी पारंपरिक रस्त्यावर बांधकाम केले आहे.
संबंधित रस्ता ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद आहे. त्याप्रमाणे या बांधकामा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने रस्त्यातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील प्रशासन कारवाई करीत नाही. या बांधकामावर कारवाई करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची आहे. मात्र तेही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे याबाबत कोकण आयुक्तांकडे दाद मागितली आहे. तसेच या बांधकामावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी पासून ग्रामपंचायत समोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतचे पत्र दिले असल्याचे घाणेकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश घाणेकर, दत्ताराम घाणेकर, तुकाराम घाणेकर, शांताराम सोलकर, संजय घाणेकर, सिद्धी घाणेकर आदी उपस्थित होते.