रत्नागिरी जिल्ह्यातील सायकलस्वारांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भरारी

0
328
बातम्या शेअर करा

दापोली – अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्स आणि अडॉक्स इंडिया रँडोनीअर (एआयआर) आयोजित अतिशय खडतर अशा २००, ३००, ४००, ६०० किमी अंतराच्या बीआरएम सायकलिंग स्पर्धा निर्धारित वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करत, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच सायकलस्वारांनी एसआर (सुपर रँडोनीअर) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील किताब मिळवत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव देशात व जगात झळकवले आहे. यामध्ये दापोली सायकलिंग क्लबचे मिलिंद खानविलकर, केतन पालवणकर आणि चिपळूण सायकलिंग क्लबचे श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले, अनंत बांदवडेकर यांचा समावेश आहे.

विशेष कौतुकाची बाब म्हणजे दोन मुलांच्या आई असलेल्या धनश्री गोखले या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एसआर नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या महिला सायकलस्वार ठरल्या आहेत. तर श्रीनिवास गोखले, धनश्री गोखले ही कोकणातील पहिली नवरा बायकोची एसआर जोडी ठरली आहे. तर मिलिंद खानविलकर आणि केतन पालवणकर हे दापोली तालुक्यातील पहिले एसआर झाले आहेत. या आव्हानात्मक खडतर स्पर्धेसाठी सर्वजण दोन वर्षांपासून तयारी करत होते. यातील सर्वांनी आपली नोकरी व्यवसाय सांभाळत अनेक स्पर्धेत सहभागी होत बक्षिसे पण मिळवली आहेत.

बीआरएम हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. फ्रान्समधील अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) ही आंतरराष्टीय संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी बीआरएम सायकल स्पर्धेचे आयोजन करत असते. बीआरएमचे २००, ३००, ४०० किंवा ६०० किलोमीटरचं अंतर हे डोंगराएवढं असतं. बीआरएम मध्ये प्रत्येक अंतरासाठी वेळ ठरवून दिलेली आहे. २०० किमीचे अंतर १३ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असते, ३०० किमीचे अंतर २० तासांत, ४०० किमीचे अंतर २७ तास आणि ६०० किमीचे अंतर ४० तासांत पूर्ण करायचं असते. याचाच अर्थ अंतर वेळेत पूर्ण होण्यासाठी ताशी १५ किलोमीटर वेगाने सायकल चालवणं गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांच्यामध्ये चिकाटी आहे असे कसलेले, सराव असलेले सायकलस्वार यामध्ये सहभागी होऊन ही राईड पूर्ण करतात.

याबद्दल अधिक माहिती देताना मिलिंद खानविलकर म्हणाले की बीआरएमच्या निमित्ताने जी आपण शारिरीक तसेच मानसिक तयारी करता त्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून दुरगामी चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात, तसेच बीआरएमच्या निमित्ताने वेगवेगळ्या वयोगटातील मित्रपरिवार भेटतो. तसेच लांब पल्ल्याच्या अंतरामुळे आपण निसर्गाची विविध रुपे अगदी जवळून पाहू शकतो. सायकलिंग करतेवेळी आपण ज्या तडजोडी करत असतो त्यातून जो मानसिक कणखरपणा अनुभवायला मिळतो त्याचा उपयोगही वैयक्तिक जिवनात होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता असणा-यांनी नक्कीच बीआरएम करायला हवी. सायकल चालवण्याचे फायदे खूप आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करावा.

या सायकलस्वारांनी बीआरएम मध्ये २०० किमीचे अंतर झाराप बांदा कणकवली खारेपाटण झाराप, ३०० किमीचे अंतर वाशी नवी मुंबई महाड वाशी, ४०० किमीचे अंतर मुलुंड ठाणे चिखली गुजरात मुलुंड, ६०० किमीचे अंतर मीरा भाईंदर भरुच गुजरात मीरा भाईंदर या खडतर मार्गावर पूर्ण केले आहे. या यशाचे श्रेय सर्व सायकलस्वारांनी आपल्या कुटुंबाला आणि सहकारी सायकल मित्रांना दिले. या यशाबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे, अनेक संस्थांमार्फत यांचा सत्कार होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे सायकल संमेलन २ जानेवारी २०२२ रोजी ९ ते ४ या वेळेत पाटणे लॉन खेड येथे सायकल क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, यामध्ये या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here