गुहागर – क्ष्रत्रिय ज्ञाती मराठा समाज सलग्न क्षत्रिय मराठा युवा संघाच्या वतीने बंगलोर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच संबधिंतावरती शासनाने कारवाई करण्यासाठी गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे तसेच गुहागर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. के जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचे नाही तर सगळ्या देशाचे दैवत आहेत.त्यांचा अवमान तर दूरच कणभर अनादर खपवून घेणार नाही, बंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अघटित घडले आहे,तरी त्याची कसून चौकशी करायला हवी, गेली अनेक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते आहे हे दुर्दैवी आहे. कर्नाटकातील शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आहे व अवमानकारक आहे. कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट शुल्लक गोष्ट म्हणून डोळेझाक केली आहे तर ही गोष्ट क्षत्रिय मराठा युवा संघ खपवुन घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता शासनाने त्वरित संबंधीतावर कडक कारवाई करण्याचे सांगावे. या संपूर्ण घटनेचा क्षत्रिय मराठा युवा संघ या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
या वेळी वकील संकेत साळवी, संदेश साळवी,निखिल साळवी,शरद साळवी, नंदकुमार खेतले, निखिल तावडे, महेश साळवी, अमर साळवी, मंदार साळवी, जय शिर्के,सुयोग विचारे,शैलेश पवार, कुणाल देसाई ,राहुल शिंदे, सागर देसाई , रोहित विचारे दिनेश शिंदे आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. क्षत्रिय मराठा युवा संघाच्या वतीने गुहागर शिवाजी चौक येथे छत्रपतीं शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुहागर नाक्या पासून रॅली काढण्यात आली. रॅलीतून घोषणा देण्यात आल्या.