खेड- एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आज खेड आगारातील काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने खेड स्थानकातून पहिली एसटी चिपळूणकडे रवाना झाली. तब्ब्ल २१ दिवसानंतर खेड स्थानकाच्या फलाटावर एसटी आल्याने स्थानकावर एसटीची वाट पाहणारे प्रवाशी आनंदित झाले. तब्बल १९ दिवसांनी खेड स्थानकावून पहिली एसटी सुटल्याने गेले अनेक दिवस सुनसान झालेले स्थानक आज पुन्हा प्रवाशांच्या कलकलाटाने गजबजून गेले.
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह अन्य काही प्रलंबित पाहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. गेले १९ दिवस हा संप सुरु होता त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लाल परीच्या चाकांना ब्रेक लागला होता. ग्रामीण भागातून शहरात येणारे ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. एसटी बंद असल्याचा फायदा उठवत खासगी प्रवाशी वाहतूकदार व रिक्षा व्यवसायिक यांनी प्रवाशांची अडवणुक करायला सुरवात केली होती.
कर्मचाऱ्यांचा संपामुळे एसटी महामंडळाचेही प्रतिदिन लाखो रुपयांचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची वारंवार विनंती केली होते. परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी कर्मचाऱ्याना भावनिक आवाहन करून कामावर रुजू होण्याची हाक दिली होती.
शासनाने केलेल्या विनंतीला धुडकावून एसटी कर्मचारी आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम होते. जो पर्यंत एसटी महामंडळाचे शासनांमध्ये विलनीकरण होत नाही तो पर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतल्याने एसटी संपाचा तिढा सुटता सुटत नव्हता.
एसटी कमर्चारी भावनिक आव्हानाला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला होता. काही जणांचे निलंबन तर काही जणांना सेवा संपत्तीची नोटीस बजावण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी एसटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर कामगारांच्या संपत फूट पडू लागली आणि काही कामगार कामावर रुजू होवू लागले.
खेड आगारातील काही कामगार देखील कामावर हजर झाल्याने आज तब्ब्ल १९ दिवसानंतर खेड चिपळूण हे पहिली एसटी बस खेड स्थानकावर चिपळूणकडे रवाना झाली जसजसे कमर्चारी कामावर हजर होतील तसतशा खेड स्थानकातून बसेस सुरु केल्या जातील अशी माहिती स्थानक प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना दिली. आजपासून खेड स्थानकातून काही बस मार्गस्थ होऊ लागल्या असल्याने गेले काही दिवस शुकशुकाट असलेल्या खेड स्थानकावर पुनः गजबजाट सुरू झाला आहे.